लोकांच्या चाळीस वर्षाच्या लढयाला यश ! कोल्हापुरात सर्किट बेंच !!
schedule02 Aug 25 person by visibility 47 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासंबंधी राज्य सरकारने शुक्रवारी (एक ऑगस्ट २०२५) अधिसूचना काढली. कोल्हापूरकरांच्या चाळीस वर्षाच्या लढयाला यश मिळाले. १८ ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या कामकाजाला प्रारंभ होत आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापणेच्या निर्णयाच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नेतेमंडळींनी प्रतिक्रिया व्यक्त करत वकील व पक्षकारांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त केला. तसेच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टातील न्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मालने आहेत.
जनतेचे व वकिलांचे अभिनंदन
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांनीही मोठे योगदान दिले. त्यामुळे तिघांचेही मनापासून आभार मानतो. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांचा विचार करुन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांचेही सर्किट बेंचच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल अतिशय मनापासून आभार मानतो. नागरिक तसेच वकिलांचेही मन:पूर्वक अभिनंदन.
लोकांना न्याय मिळेल
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, ‘सरकारने कोल्हापूरला सर्किट बेंचला मान्यता दिली आहे. लोकांच्या लढ्याला यश आले. लोक अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी लढत आहेत. महायुती सरकारचा हा निर्णय लोकांना न्याय देणारा आहे. सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार यांना दिलासा मिळाला. सर्किट बेंचमुळे लोकांच्या श्रमाची, वेळेची बचत होईल.’
महायुती सरकारकडून कोल्हापूरला गिफ्ट
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूरची जनता लढावू बाण्याची आहे. तर राज्यातील महायुती सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार लोकाभिमुख कारभार करत आहे. त्यामुळेच कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर करून, एका दिर्घ लढयाला यश आले आहे।सहा जिल्हयातील हजारो नागरिक आणि वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लढयात सहभागी असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.’
सर्किट बेंच" वकिलांच्या एकजुटीचा विजय
आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ‘कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशी गेली ४० वर्षापासूनची मागणी होती. सर्किट बेंचची स्थापना ही गेली अनेकवर्षे आंदोलने, उपोषणे, निवेदनाद्वारे लक्ष वेधणाऱ्या वकिलांच्या एकजुटीचा विजय आहे. यापुढील काळात कोल्हापूर येथे कायमस्वरूपी हायकोर्टाचे न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी आग्रही भूमिका ठेवणार आहे.
लोकांचे चाळीस वर्षाचे स्वप्नं साकार झाले
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर बेंच आज अखेर जाहीर करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते, विधायक आणि याचिकाकर्ते तसेच कोल्हापुरी लोक यांच्या चळवळीचा चाळीस वर्षांचा हा स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाला. या मागणीसाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींना अभिनंदन!
अखेर कोल्हापुरकरांच्या लढ्याला यश
आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी मागणी कोल्हापुरातील विविध वकील संघटना आणि पक्षकारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. महायुती सरकारने ही मागणी पूर्ण करण्याचा विश्वास दिला होता. सर्किट बेंच मंजूर केले. कोल्हापूरकरांच्या लढयाला यश मिळाले. सर्किट बेंचमुळे वकील, पक्षकारांना न्याय मिळेल, त्यांच्या वेळेची बचत होईल.’