व्ही. बी. पाटलांचे मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप, भैया मानेंचा पलटवार
schedule07 May 26 person by visibility 82 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘संस्था जिहाद करुन मंत्री हसन मुश्रीफ यांचा गोकुळ दूध संघ स्वत:च्या घशात घालण्याचा डाव आहे. त्यांच्या पाच वर्षेच्या सत्ता काळात गोकुळमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेली २५ वर्षे ते नेतृत्व करत आहेत. त्या बँकेत किती भ्रष्टाचार झाला असेल ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार खोदून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी गोकुळमधील घडामोडीवरुन मंत्री मुश्रीफ यांना लक्ष्य केले. पाटील म्हणाले, ‘गोकुळमधील पाच वर्षाच्या सत्ता कालावधीत सत्ताधाऱ्यांनी बोगस संस्था काढल्या. एकेका गावात आठ ते दहा संस्था निघाल्या आहेत. व्यक्ती एकच, संस्था अनेक असा प्रकार सुरू आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद असे शब्द कानावर येत होते आता संस्था जिहादचा प्रकार सुरू आहे. बोगस संस्था काढून गोकुळ दूध संघ घशात घालण्याचा हा प्रकार आहे.
व्ही. बी. पाटील म्हणजे एक अस्वस्थ आत्मा
मंत्री मुश्रीफ यांच्यावर व्ही. बी. पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांनी घेतला आहे. माने यांनी म्हटले आहे, ‘व्ही. बी. पाटील म्हणजे एक अस्वस्थ आत्मा आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँकेचे अध्यक्ष असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण भावना व्यक्त केलेल्या आहेत. मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेत नवीन संस्था सभासद केल्याबद्दल त्यांचा आरोप आहे. लोक ज्यावेळी संस्था काढतात त्यावेळी ज्या नेत्यावर त्यांचे प्रेम असते त्यांचे नाव देतही असतात. निव्वळ "आमानी" आणि "तुमानी" असल्या पोकळ शब्दांचा बाजार मांडल्यावर ते संस्थाना नावे देत नाहीत. त्यासाठी लोकांचं आणि लोकांवरही प्रेम करावं लागतं. तसेच; व्ही. बी पाटील हे कोणत्याही सार्वजनिक निवडणुकीत निवडून आलेले नाहीत. त्यांनी किमान कोल्हापुरातील एखाद्या प्रभागातून तरी निवडून यावं. सातत्याने कानाला लागणे आणि समज- गैरसमज वाढविणे, हाच त्यांचा कायमचा धंदा आहे. ’