द्रूतगती महामार्गावर ई चलनद्वारे बसधारकांची आर्थिक लूट, प्रदीप राठोडांचे सोमवारपासून आमरण उपोषण
schedule07 May 26 person by visibility 636 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे- मुंबई द्रूतगती महामार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसवर परिवहन विभागाकडून ई-चलनाद्वारे होत असलेल्या दंडात्मक कारवाईविरोधात बस व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहेत. अन्यायकारक दंड आकारणी तात्काळ थांबवावी, अन्यथा सोमवार ११ मे २०२६ पासून कोल्हापूर आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा व्यावसायिक प्रदीप राठोड यांनी दिला आहे. तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य ट्रॅव्हल्स व्यावसायिक लाक्षणिक उपोषण करणार आहेत. गुजरात व कर्नाटकात ज्या पद्धतीने दंडात सवलत दिली जाते, त्या पद्धतीने महाराष्ट्रातही दंडात सवलत मिळावी अशी मागणी खासगी बस मालकांची आहे.
बस व्यावसायिकांची आर्थिक लूट थांबवावी. आतापर्यंत आकारण्यात आलेले दंड माफ करावेत आणि पुढील काळात अशा प्रकारची कारवाई होऊ नये यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे असे राठोड यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर रोज शेकडो बसेस धावत असताना किरकोळ कारणांवरून हजारो रुपयांची ई-चलने पाठवली जात आहेत. काही ठिकाणी ताशी ३५ किंवा ४० किलोमीटरपेक्षा अधिक वेग दाखवून ४ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो, तर टोलनाक्यांवर लेन बदलल्यास २ हजार रुपयांचा दंड लावला जात आहे. अशा दंडात्मक कारवाईमुळे प्रत्येक बसवर वार्षिक लाखो रुपयांचा आर्थिक बोजा पडला आहे. यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत आहेत. सरकार, परिवहन विभाग व लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. म्हणून आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला मनोज चौगुले, अशोक शिंदे, सतीश कांबळे, गौरव कुसाळे, पंकज त्रिपाठी, राजू ढाले, सुनील मगदूम, झाकीर तहसिलदार आदी उपस्थित होते.