हिल रायडर्सची यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती मोहीम, चार जुलैला सुरुवात
schedule24 Jun 26 person by visibility 47 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनतर्फे यंदा ‘अमृतमहोत्सवी पन्हाळा ते पावनखिंड राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहीम चार जुलै २०२६ पासून आयोजित केली आहे. अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील, विनोद कांबोज यांनी दिली. फाऊंडेशनतर्फे आयोजित मोहिमेचे यंदा चाळीसावे वर्ष आहे. यावर्षी चार जुलैला ७४ वी, १८ जुलैला ७५ वी आणि एक ऑगस्टला ७६ वी मोहीम आयोजित केली आहे.
फाऊंडेशनमधील सदस्य दिवंगत वस्ताद सूरज ढोली व युवराज साळोखे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ’शिलेदार स्कॉलरशिप’सुरू केले आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत इयत्ता सातवी, आठवी व नववीत प्रथम आलेल्या मुला, मुलींना शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. मोहिमेविषयी सांगताना पाटील म्हणाले,’१२ जुलै १९८६ रोजी पदभ्रमंती मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत अनेक घटकांचे सहकार्य व वाढता प्रतिसाद लाभला. पदभ्रमंती मोहिमेसोबतच या मार्गावरील वाड्यावस्त्या, दुर्गम गावांसाठी सामाजिक बांधिलकी मानून फाऊंडेशनने काम केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वााटप केले.कम्प्युटर भेट दिले. करपेवाडी, अंबेवाडी येथे मोहिमेत सहभागी होणाऱ्यांसाठी निवासासाठी हॉल बांधणीसाठी सरकारकडे प्रयत्न केले. ’
कांबोज म्हणाले, ‘गेल्या चाळीस वर्षात जवळपास पन्नास हजार शिवभक्त या मोहिमेत सहभागी झाले. शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला. गेल्या काही वर्षापासून वर्षातून तीन मोहिमा आयोजित केल्या जात आहेत. यंदाच्या मोहिमेत सत्तर मूकबधिर मुले सहभागी होत आहेत.’ पत्रकार परिषदेला पी. डी. जाधव, प्रताप माने, ऋषीकेश पवार, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.