जिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर, प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट
schedule24 Jun 26 person by visibility 43 categoryशैक्षणिकजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्याला कोल्हापूरने नेहमीच एक वेगळी दिशा दिली आहे.केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गंत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . जॅसमिन यांनी केले. २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या या योजनेला प्रारंभ झाला. जिल्ह्यासाठी सुमारे ४६ हजार २५२ निरक्षरांना,साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांना देण्यात आले असल्याची माहिती योजना विभागच्या शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्र यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या व्हिडिओ कॉन्फरसिंग हॉल मध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणी अनुषंगाने जिल्हास्तरीय नियामक परिषदेची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे प्रामुख्याने उपस्थित होते. जॅसमिन म्हणाल्या, असाक्षरांना साक्षर करणे ही या मोहिमेचे उद्दिष्ट नसावे.नवसाक्षरता ही सामाजिक चळवळ म्हणून हाती घेण्यात यावी.या कामी महाविद्यालयीन युवकांची मदत घेण्यात यावी. ही मोहीम विहित कालावधीत पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने महाविद्यालयीन युवकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.जिल्ह्यातील सर्व गावांचा साक्षरतेच्या अनुषंगाने गावनिहाय डेटा तयार करावा अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हा सांख्यिकी विभागाच्या उपायुक्त सीमा अर्दाळकर,मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी विजय माळी, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी चंद्रशेखर ओतारी उपस्थित होते.