महायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीच
schedule06 Oct 26 person by visibility 77 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की बिनविरोध करणार अशा चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली होती. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी, सात ऑक्टोबर रोजी उमेदवारांची नावे जाहीर करू असे स्पष्ट करत बिनविरोधाच्या चर्चेला ब्रेक दिला. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी गोकुळच्या निवडणुकीत उतरली आहे. या आघाडीकडील उमेदवारांची नावे बहुतांशी निश्चित झाली आहेत. इच्छुक उमेदवार तालुकानिहाय दौरे करत आहेत. दुसरीकडे महायुतीचे नेते मंडळीमध्ये अजूनही जागा वाटपावरुन धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपासंबंधी बैठक झाली. फॉर्म्युला ठरला. मात्र संख्याबळाच्या आधारे जागा हव्यात यासाठी नेत्यांचा आग्रह आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामुळे महायुतीतील सगळया घटकांना जादा जागा हव्या आहेत. यामुळे महायुतीच्या उमेदवारांची घोषणा लांबली आहे. आता गुरुवारी आठ तारखेला महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होईल. गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमातंर्गत आठ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उमेदवरी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आठ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप आहे.