इंधन बचतीचा फंडा…जिप अध्यक्षांचा प्रवास बसमधून, उपाध्यक्ष - सभापती ई बाईकवरुन ! अधिकारी सायकलवर!!
schedule15 May 26 person by visibility 541 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी एसटी बसमधून प्रवास केला तर उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी ई बाईकवरुन जिल्हा परिषद गाठले.बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर यांनी इलेक्ट्रिक गाडीला पसंती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार अधिकारी डॉ. जस्मिन या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनातून जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांची इलेक्ट्रिक गाडी आहे तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांनी सायकलवरुन जिल्हा परिषद गाठले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा परिषदेने दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कुणी सायकलला पसंती दिली तर कोणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत एसट व केएमटी बसमधून जिल्हा परिषदेपर्यंत प्रवास केला. दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची चलतीही पाहावयास मिळाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यानी कागल-रंकाळा एसटीतून कोल्हापुरात पोहोचल्या. दसरा चौकात उतरुन रिक्षाने जिल्हा परिषदेत आल्या. उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक दुचाकीला प्राधान्य दिले. ई दुचाकीवरुन त्यांनी जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रवास केला. बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर यांनी ही इलेक्ट्रिक वाहनाला पसंती दिली आहे.
जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही इंधन बचत उपक्रमात सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एसटी, केएमटी बसमधून प्रवास केला तर काहींनी सायकलवरुन जिल्हा परिषदेपर्यंत प्रवास केला. जिल्हा परिषद प्रशासनाने, जिल्हा परिषदेचे दोन्ही प्रवेशद्वार बंद ठेवले होते. जिल्हा परिषदेच्या आवारात वाहनांना मनाई केली होती.