वंचित मुलांना मॉलची सफर, सरकत्या जिन्याचा आनंद, सिनेमाच्या दुनियेची सैर अन् मनोरंजनाची मेजवाणी
schedule14 May 26 person by visibility 40 categoryसामाजिक
डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालकल्याण व उमेद संस्थेतील मुलांसाठी ‘राजा शिवाजी’सिनेमाचा विशेष शो
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मॉलच्या दुनियेतील रंगीबेरंगी वस्तू कुतुहलाने न्याहळणाऱ्या नजरा…सरकत्या जिन्यावरुन ये - जा करताना चेहऱ्यावर फुललेला आनंद… शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून अभ्यासलेल्या शिवचरित्राचा पराक्रमी इतिहास पडद्यावर उलगडताना आपसूकपणे घुमणारा ’छत्रपती शिवाजी महाराज की’चा घोष…आरामदायी खुर्चीत बसून मिळणारी मनोरंजनाची मेजवानी आणि हाती पॉपकॉर्नचा डिश…सारेच सुखद धक्के देणारे प्रसंग…यामुळे बालकल्याण संकुलमधील मुले आणि उमेद संस्थेतील वीटभट्टी कामगारांच्या मुलांचा चौदा मे हा दिन स्पेशल ठरला.
निमित्त होतं, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसाचे. कोडोलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन, वाढदिवस समिती तसेच संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान विचारेमाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत बालकल्याण संकुल व उमेद फौंडेशनच्या मुले तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी पीव्हीआर डीवायपी येथे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शो भरविा होता. डॉ. प्रविण कोडोलीकर हे दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवितात. यंदा त्यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून, गुरुवारी वंचित घटकातील मुलांना वेगळया दुनियेची सैर घडविली. जवळपास दीडशेहून अधिक मुले यामध्ये सहभागी झाले. या मुलांच्या प्रवासासाठी केएमटीच्या तीन बसेस संयोजकांनी उपलब्ध केल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास केएमटी बसमधून ही मुले डीवायपी मॉलच्या प्रागंणात उतरली. आणि साऱ्यांच्याच नजरा विस्फारल्या. मॉलमधील रंगीबेरंगी वस्तू, चकचकीत शोरुम्स पाहत मुलांनी सरकत्या जिन्यावरुन सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचले. सरकत्या जिन्यावरील येजा करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.
सगळी मुले थिएटरमध्ये आसनस्थ झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून डॉ. कोडोलीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, अभिजीत खतकर, नगरसेविका दिपाली घाटगे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, वसंत डावरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष मंजित माने, बालकल्याण संकुलच्या पदाधिकारी पद्मजा तिवले, प्रयोदी फाऊंडेशनच्या योगिता कोडोलीकर, वाचनकट्टाचे युवराज कदम, , शुभम शिरहटी, निलेश बनसोडे, अजिंक्य शिंदे, प्रकाश गाताडे, किशोर माने, सुशील भांदिगरे, महेश राठोड, विराज सुतार, राजेश घाटगे, योगेश कांबळे, विनायक सुतार, ऋतुराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला.
‘वाढदिवसाचे औचित्य साधून प्रविण कोडोलीकर यांनी राबविलेला हा समाजाभिमुख उपक्रम आहे. वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणारा आहे. शाळकरी मुलांच्या जीवनात आनंद फुलवितानाच ‘राजा शिवाजी’ सारख्या प्रेरणादायी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कार रुजविण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.’असे कौतुकोदगार साऱ्याच मान्यवरांनी काढले. शिवसेनेचे उपनेते पवार, देवणे, नगरसेवक क्षीरसागर, आरपीआयचे पदाधिकारी कांबळे यांची मनोगते झाले. शाहीर रणजीत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. शुभेच्छांचा हा कार्यक्रम संपल्यानंतर ‘राजा शिवाजी…’सिनेमाला प्रारंभ झाला. थिएटरमध्ये उपस्थित मुलांनी, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’असा घोष केला. पडद्यावर शिवकाळातील एकेक प्रसंग उलगडताना मुले तो रोमांचकारी इतिहास डोळयात साठवित गेले. तीन तासाहून अधिक वेळ मुले मनोरंजनाच्या वेगळया दुनियेत हरवले.कार्यक्रमानंतर हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.