डॉ. संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने सन्मान
schedule14 May 26 person by visibility 40 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना 'द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन’ हा पुरस्कारदेखील त्यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘सेलिब्रिटिंग अ व्हीजन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र- कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, एलिव्हेट हेल्थकेअरचे नॅशनल हेड प्रवीण मित्तल, डी वाय पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड वृंदन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉ. शिंपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. सेंटर हेड डॉ. संकेत पाटील यांनी गेल्या पाच वर्षातील सेंटरची कामगिरी आणि प्रगतीचा आढावा घेतला. रिचर्ड लिवसी यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, सिम्युलेशन आधारित शिक्षणामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी, डॉक्टर्स यांना अधिक आत्मविश्वासाने उपचार करता येतात. भविष्यातही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’ यावेळी कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे कुलसचिव डॉ. नितीन सिप्पी, सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉ. शिंपा शर्मा, सेंटर हेड डॉ. संकेत पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई उपस्थित होते. डॉ. सुरुची पवार, डॉ. रश्मी बावडेकर, डॉ. अमृता पवार यांनी सूत्रसंचालन केले.