दिवा विझला कायमचा….
schedule02 Jul 26 person by visibility 159 categoryसामाजिक
दिवा विझला कायमचा….
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील डाव्या चळवळीतील लढवय्या महिला कार्यकर्त्या म्हणून सुशीला बाबासाहेब यादव या परिचित. मोलकरीण, शेतमजूर व परिचारिका संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिलांन संघटित केले. त्या घटकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. १८ जून १९५५ रोजीचा त्यांचा जन्म. सामाजिक चळवळींशी पहिल्यापासून संबंधित. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध आंदोलनात, चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. निदर्शने, मोर्चे अशा लोकशाही मार्गाने लढल्या. संपूर्ण कुटुंबंच डाव्या चळवळीत. त्यांनी कधी पक्ष बदलला नाही की विचारधारा सोडली नाही. त्यांचे, एक जुलै २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या पश्चात त्यांचा मुलगा मिलिंद यादव यांनी आपल्या भावना फेसबुक पेजवर व्यक्त केल्या. मुलाच्या आईविषयीच्या त्या आठवणी…
‘ वर्षापूर्वी झालेल्या मणक्याच्या ऑपरेशनमुळे ती तशी खचलीच होती. जिना चढतांना त्रास होतो म्हणून दोन छोट्या खोल्यांच्या पसाऱ्यातून ती बाहेर पडलीच नाही. पण दुखण्याचं ओझं तीनं आमच्यावर टाकलं नाही. याला आत्मसन्मान म्हणावं की अहंकार ? काहीवेळा कामामुळे तर काहीवेळा जेवणावळीमुळे रात्री उशीरा घरी यायचो.फार उशीर झाला तर तिचा फोन ठरलेला आणि 'रस्त्यात आहे येतोय पाच मिनिटात.' हे माझं उगाचच दिलासा देणारं ठरलेलं खोटं वाक्य. उशीरा घरी यायचो.
गाडी बाजुला उभी करायचो. इकडं गाडीचा आवाज बंद व्हायचा आणि दुसऱ्या मजल्यावर जळणारा एक दिवा बंद व्हायचा, निशब्दपणे. मी सुखरूप घरात पोहचलोय या खात्रीनं ती झोपी जायची. काल तर रात्रही नव्हती. मी घरातच होतो. गाडीचा आवाज बंद करण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही ....दिवा विझला.... कायमचा. आता कधी उशीरा घरी आलो तर, लक्ष वर जाईल. दिवा लागलेला नसेल. तो अंधार मलाच करील, निशब्द…
'ती गेली तेव्हा रिमझीम,
पाऊस निनादत होता.'