उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक
schedule02 Jul 26 person by visibility 98 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया' आणि 'मेड इन इंडिया' या उपक्रमांच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्रासाठी उपलब्ध होत असलेल्या संधींचा आढावा घेतला. उद्योगांनी नावीन्य, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे, तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत एमएसएमई क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, 'असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
कोल्हापूर शाखा, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल अंतर्गत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित 'उत्थान – आयसीएआय एमएसएमई महोत्सव २०२६' आयोजित केले आहे या महत्त्वाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार महाडिक बोलत होते. २ जुलै २०२६ रोजी द पॅव्हेलियन हॉटेल येथे हा महोत्सव झाला.
यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी.ए. अशिष सेवेकरी, उपाध्यक्ष सी.ए. आलोक शहा, सचिव सी.ए. राघवेंद्र बकरे, खजिनदार सी.ए. निखिल देवणे, माजी अध्यक्ष सी.ए. नितीन हरगुडे तसेच विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षा सी.ए. प्रीती पाचोरे उपस्थित होत्या. कोल्हापूर फस्टचे प्रमुख सुरेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, सरकारी योजना, उद्योगवाढीच्या संधी, वित्तपुरवठा, डिजिटल परिवर्तन आणि व्यवसाय विकास याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे होते. या निमित्ताने उद्योजकांना उद्योगवाढीसाठी आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान, नवीन संधी आणि शासकीय योजनांची माहिती एका व्यासपीठावर मिळाली अशा प्रतिक्रिया या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी नोंदवल्या.
महोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी एमएसएमई उद्योजकांसाठी उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले. सी.ए. चंदन लाहोटी यांनी एमएसएमईसाठी उपलब्ध विविध संधी या विषयावर उद्योगवाढीच्या नव्या संधी स्पष्ट केल्या. सी.ए. नितीन हरगुडे यांनी एमएसएमई उद्योगांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सिद्धार्थ पंडित यांनी ब्रँडिंग व व्यवसायाचा प्रभावी प्रचार कसा करावा याविषयी आधुनिक मार्केटिंग तंत्रांची माहिती दिली. ॲड. धनेश राळे यांनी एमएसएमईसमोरील व्यावहारिक समस्या व त्यांवर मात करण्याचे उपाय या विषयावर कामगार कायदे, मानवी संसाधन, पर्यावरणविषयक अनुपालन तसेच स्थानिक प्राधिकरणांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे सखोल विवेचन केले. सी.ए. यतीराज मर्दा यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रोत्साहनपर योजना, अनुदाने व सवलतींचा उद्योगांना कसा लाभ घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उद्योजकांच्या शंकांचे निरसन केले. एमएसएमई क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असून उद्योगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चार्टर्ड अकाउंटंट्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मान्यवरानीञकेले. उद्योग, शासन आणि व्यावसायिक यांच्यातील समन्वय वाढवून अशा ज्ञानवर्धक उपक्रमांमुळे उद्योजकांना योग्य दिशा, आवश्यक मार्गदर्शन आणि नवीन संधी उपलब्ध होऊन उद्योगवृद्धीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए सेवेकरी यांनी प्रास्ताविक केले महोत्सवाची माहिती शाखा अधिकारी स्वप्निल सादळे यांनी दिली