वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ; सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चा
schedule02 Jul 26 person by visibility 100 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक संघ येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेत करवीर, कोल्हापूर शहर आणि गगनबावडा तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सहविचार सभेत मुख्याध्यापकांचे उपशिक्षण अधिकाऱ्यांनी विविध १७ विषयांवर शैक्षणिक मंथन केले.
मुख्याध्यापक संघाचे सचिव आर .वाय. पाटील यांनी सहविचार सभा आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. महापालिकेच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांनी अतिरिक्त पुस्तकांच्या समायोजनाबाबत माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी व्ही.एस . के. पोर्टलवरील विद्यार्थी हजेरी नोंद, विविध समित्यांचे गठण, विद्यार्थी प्रमोशन, आधार व्हॅलिड विद्यार्थी, जात, जन्म आणि नावातील बदलांबाबतच्या प्रस्तावाबाबत मुख्याध्यापकांना सजग केले. पर्यावरण मोहिमेबाबत शाळांनी शाळेत इकोक्लब स्थापन करुन वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याविषयी आवाहन केले. दोन महिन्यात शाळांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक मिळतील असा आशावादही व्यक्त केला.
उपशिक्षणाधिकारी आर. जी. चौगुले यांनी पटसंख्या टिकवणे शाळांसमोर आव्हान आहे. मुख्याध्यापकांनी सखोल अभ्यास करणेविषयी आवाहन केले. वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा असली पाहिजे हे सांगतानाच प्रशासनात भावनेला फार महत्व देवू नये असेही सांगितले. नशामुक्ती अभियान, चिराग ॲप, विद्यार्थी सुरक्षा, तक्रारपेटी, सीसीटीव्ही, सखी सावित्री याबाबतच्या कार्यवाहीचे विवेचन केले. उपशिक्षणअधिकारी धनाजी पाटील यांनी एच. पी.व्ही. लसीकरण, पालकसभा, अकरावी प्रवेश, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार याबाबतचे विवेचन केले . मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आभार मानले. यावेळी संचालक बी. बी. पाटील, संजय पाटील, दत्ता पाटील, युवराज पाटील, सुरेश संकपाळ, संजय सौंदलगे, सुधीर सातवेकर, अश्विनी पाटील, वृषाली कुलकर्णी, विजय भोगम उपस्थित होते