अंबाबाई देवीच्या मूर्तीवर दोन दिवस संवर्धन प्रक्रिया ! भाविकांना ११-१२ ऑगस्टला मूळ मूर्तीचे दर्शन नाही !!
schedule09 Aug 25 person by visibility 122 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया ११ व बारा ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. यामुळे या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नाही. भाविकांच्या सोयीसाठी कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना योग्य पद्धतीने दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्रच्यावतीने मूर्तीची पाहणी करण्यासकरिता वेळोवेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांना कळविणेत आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांचे कडून मूर्तीची पाहणी व संवर्धन १६ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आली होते. त्यावेळेच्या सुचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने याबाबतचे पत्र १२ जून रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्लीा्र यांना मूर्तीचे नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन प्रक्रिया करणेबाबत कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्यावतीने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यामुळे श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सोमवारी ११ ऑगस्ट ते मंगळवारी १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत भाविकांना घेता येणार नाही, या कालावधीमध्ये भाविकांना श्रींची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवणेत येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.