तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule14 Aug 25 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सदन स्थापन करावे अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. श्री तिरुपती बालाजी दर्शन पास, निवासव्यवस्था, पर्यटन माहिती देणारे महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. याबाबत तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अवर मुख्य सचिवांना दिल्या आहेत. तिरुपती मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक दरवर्षी जातात. श्री तिरुपती बालाजी मंदिरास भेट देणारे लाखो भाविक करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यास येतात. ही दोन्ही मंदिरे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश दोन्ही राज्यासह संपूर्ण देशभरातील भाविकांचे धार्मिक श्रद्धास्थान आहेत. बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते. भाविकांची गैरसोय दूर होवून श्री तिरुपती बालाजीचे दर्शन पास सुविधा, निवासव्यवस्था, पर्यटन माहिती देणारे महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन होणे आवश्यक आहे. असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.