गोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन वाढीसाठी राबविणार विविध योजना
schedule14 Jun 25 person by visibility 93 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे वरिष्ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे झाली. या मिटिंगमध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना, म्हैस दुधाच्या संकलन वाढीच्या संधी व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गोकुळच्या चेअरमनपदी निवडीबद्दल मुश्रीफ यांचा संघाच्या अधिकाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा म्हैस दुधासाठी राज्यभर ओळखला जातो. म्हैस दुधाची बाजारपेठ अधिक व्यापक असून दुधाची मागणी जास्त आहे. त्यामुळे म्हैस दुधाचे संकलन वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोकुळच्या जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच दूध उत्पादकांसाठी असलेल्या गोकुळच्या विविध योजना भविष्यात अधिक प्रभावीपणे राबविणार असून जिल्ह्यातील व सीमा भागातील जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. ज्यामुळे भविष्यात वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट साध्य होईल.’
बैठकीत दूध संकलनातील घट वाढ, कार्यक्षेत्रातील व बाहेरील दूध संकलन वाढीसाठी विविध उपायोजना, दुधाची गुणवत्ता, पशुसंवर्धन विभाग, पशुखाद्य विभाग, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन, संघाच्या विविध योजनांची अंमलबजावणीची गती वाढवणे यासंबंधी चर्चा झाली. गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी यांनी संकलन विभागाच्या सर्व अडचणी व संधी यांचा आढावा घेत उपाययोजना सुचविल्या. डॉ.एम.पी.पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रा. किसन चौगले यांनी आभार मानले. संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संघाचे अधिकारी अनिल चौधरी, अरविंद जोशी, शरद तुरंबेकर, डॉ.प्रकाश साळुंके, व्ही.डी.पाटील, दत्तात्रय वाघरे उपस्थित होते.