शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार : माजी आमदार ऋतुराज पाटील
schedule11 Aug 25 person by visibility 65 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला असून, हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.शक्तीपीठ महामार्ग विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्यासमोर सरकारला झुकावेच लागेल, असा इशारा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली, कोगील बुद्रुक ,कणेरीवाडी , कणेरी, खेबवडे येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी करणारी निवेदने पाटील यांना दिली
शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणी केली होती का? जमिनी जाऊन महामार्ग झाला तर चालेल का ? असे प्रश्न पाटील यांनी विचारल्यावर शेतकऱ्यांनी एकमुखाने ‘शक्तिपीठ नको’ अशा घोषणा दिल्या. कोल्हापूरमधील एकूण ५९ गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून, त्यात दक्षिण मतदारसंघातील १० गावे आहेत. सुपीक जमिनी गमावण्याचे हे मोठे संकट असल्याचे त्यांनी सांगितले. १५ ऑगस्टला शेतात झेंडा लावून ‘शक्तीपीठ महामार्गापासून स्वातंत्र्य’ असा संदेश द्यावा, असे आवाहन ऋतुराज पाटील यांनी केले. जनजागृती मोहिमेत गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, विजय पाटील, प्रकाश पाटील, सुदर्शन खोत, तानाजी भोसले युवराज पाटील, निवास ताकमारे, राजू घराळ, सुयोग वाडकर, बबलू वडिंगेकर सहभागी झाले.