जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणी
schedule01 Oct 26 person by visibility 43 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. नागरिक व पशुधनासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
जिल्हाधिकारी घोष यांनी गुरुवारी ( एक ऑक्टोेबर २०२६ ) जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, संख अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसिलदार धोडमाळ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी घोष म्हणाले,‘व्हसपेठ परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन दिवसापूर्वी म्हैसाळ योजनेचे पाणी व्हसपेठ तलावात भरून घेण्यात येत आहे. त्याचा उपयोग परिसरातील सुमारे दहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी करता येणार आहे. जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी स्तरावर देण्यात आले असून, टँकरची मागणी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत तातडीने कार्यवाही करता येणार आहे. टँकर भरण्यासाठी आवश्यक पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण करणे महत्त्वाचे असून, पशुधनासाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे.’
अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन
जत तालुका मोठा असल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे. पिण्याचे पाणी, चारा किंवा पिकांच्या नुकसानीसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शेतकऱ्यांचे नुकसान व अडचणी दूर करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल असे आवाहन त्यांनी केले.