शेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंती
schedule01 Oct 26 person by visibility 475 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दूध उत्पादकांशी निगडीत विषय असो की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन…प्रत्येक ठिकाणी पोटतिडकीने भूमिका मांडणारे, रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा लढवय्या कार्यकर्ता म्हणजे बाबासाहेब देवकर. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांच्या मुशीत घडलेला हा कार्यकर्ता गेली तीन दशके राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीतून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. नेतेमंडळीचा विश्वास आणि दूध उत्पादकांची साथ यामुळे त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज यंदा गोकुळमध्ये पोहोचणार असा विश्वास व्यक्त होत आहे. समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांचा तालुकानिहाय दौरा सुरू आहे. या दौऱ्यात दूध उत्पादकांकडून त्यांच्या उमेदवारीला पसंती मिळत आहे.
देवकर हे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सहचिटणीस आहेत. वयाच्या पंधराव्या -सोळाव्या वर्षापासून त्यांची शेकापची नाळ जुळली. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील, बाजीराव वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनातून त्यांचा सहभाग राहिला. त्यांनी, सहा वर्षे नोकरी केली. मात्र सामाजिक चळवळी, सहकारातील आंदोलने या माध्यमातून सामान्य लोकांसाठी काम करण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना. १९९९ पासून ते शेतकरी कामगार पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. २००७ ते २०२१२ या कालावधीत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. अभ्यासू सदस्य म्हणून सभागृहात छाप उमटविली. शेती, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील सेवासुविधांच्या उपलब्धता ग्रामीण भागात पोहोचाव्यात यासाठी काम केले.
शेतकरी व दूध उत्पादकांच्या न्याय मागण्यांच्या लढयात सक्रिय सहभाग घेतला. पशुखाद्य दरवाढीविरोधातील आंदोलन असो की कर्जमाफीचा लढा…शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन असो की ऊसदराचा प्रश्न…प्रस्तावित शक्तीपीठला विरोध प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव ठेवत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला. आता होत असलेल्या गोकुळच्या निवडणुकीसाठी समविचारी आघाडीकडून शेकापतर्फे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. समविचारी आघाडीचे नेते व इच्छुक उमेदवार सध्या तालुकानिहाय दौरे करत आहेत. या दौऱ्यात ठरावधारकांचा मोठा प्रतिसाद समविचारी आघाडीला मिळत आहे. देवकर यांच्यासारखा अभ्यासू कार्यकर्ता गोकुळमध्ये असावा अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची भावना बळावत आहे.