विवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चित
schedule21 Aug 26 person by visibility 203 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने यापूर्वीच अडतीस हजार शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी पूर्ण करून आघाडी घेतली आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आणि विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी शुक्रवारी, २१ ऑगस्ट २०२६ रोजी आणखी सहा हजार फॉर्म जमा करत आघाडी घेतली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी कौस्तुभ गावडे यांनी नियोजनबद्ध काम केले आहे. गावडे हे पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून निवडणुकीची तयारी करत आहेत.
येथील विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन मध्ये शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने मतदार नोंदणीतील अभियानचे मंत्री पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘ज्याचे मतदार जास्त तो विजयी उमेदवार असे सूत्र आहे. या न्यायाने विवेकानंद शिक्षण संस्थेने आणखी नोंदणी केल्यास पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार मोठया मताधिक्यांनी विजयी होतील. कौस्तुभला तिकीट ही मिळेल आणि विजयी ही होईल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी, ‘शिक्षकांच्यावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी विधानपरिषदेमध्ये शिक्षकांच्या हक्काचा कर्तबगार सदस्य जाणे गरजेचे आहे. , 2005 अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व्यापक काम सुरु असून शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना़ मिळवणे हे प्रमुख ध्येय आहे. शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न पुढील सहा वर्षात सोडविणे यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक बंधू भगिनी एकत्र येऊन आपल्या पाठीशी उभे राहतील. ’ असा विश्वास व्यक्त केला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आगामी काळातही अधिकाधिक मतदार फॉर्म जमा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.