स्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकार
schedule21 Aug 26 person by visibility 40 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक खर्च करण्याच्या अधिकाराचा विषय उपस्थित झाला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच- प्रशासकांना आर्थिक खर्च करण्याचे अधिकार नसल्यामुळे पायाभूत सुविधा, विकास कामांना निधीची उपलब्धतेला ब्रेक बसल्याचे जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी निदर्शनास आणले. सरकारकडे विशेष मागणी करुन संबंधित ग्रामपंचायतीत विकास कामांना निधी उपब्लध झाला पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी असा आग्रह धरला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ‘पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्यांना सह्यांचे अधिकार देऊन प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पायाभूत सुविधा व अन्य कामासाठी आर्थिक खर्च करता येईल.’असे मार्गदर्शन मंत्रालयाकडून मिळाल्याचे सीईओ जॅसमिन यांनी सदस्यांना सांगितले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली.
स्थायी समिती सभेतील पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींना तब्बल ७५ कोटी रुपयांची विकासकामे करता येणार आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. त्या ठिकाणी सरपंच- प्रशासक आहेत. मात्र त्यांना आर्थिक खर्चाचे अधिकार नाहीत. आर्थिक खर्चाचे अधिकार नसल्यामुळे गावातील दिवाबत्ती सुविधा, रस्त्याची कामे, इमारत दुरुस्ती अशी विविध कामे रखडली आहेत. ४३३ ग्रामपंचायतीसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी विविध कामासाठी उपलब्ध आहे. मात्र खर्चाचे अधिकारच नसल्यामुळे कामे ठप्प होती. या साऱ्या बाबी सदस्य कुपेकर यांनी सभेत मांडल्या. प्रशासनाने मंत्रालय स्तरावर मार्गदर्शन घेण्याविषयी त्यांनी सूचना केली. त्यानंतर पुढील कार्यवाही होऊन ४३३ ग्रामपंचायतींना ७५ कोटी रुपयांचे आर्थिक खर्चाचे अधिकार मिळाले.
स्थायी समितीच्या सभेत, भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा बीओटी तत्वावर की कर्ज घेऊन विकसित करायचे यासंबंधी येत्या पंधरा दिवसात स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याचे ठरले. येत्या सर्वसाधारण सभेपूर्वी ही बैठक घेऊन विविध पर्याय तपासले जाणार आहेत. यासह जंगली प्राण्यांपासून शेती व शेतपिकांचे होणारे नुकसा यासंबंधी काय उपाययोजना करायच्या याविषयी चर्चा झाली. सदस्य अभिजीत तायशेटे, रश्मी देसाई, सुधीर देसाई, आदींनी सहभाग घेतला. उपाध्यक्ष तानाजी पाटील, सभापती सारिका नांदेकर, श्रद्धा गायकवाड, शितल यादव, विद्या विलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली.