ऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शन
schedule24 Jun 26 person by visibility 307 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्यावतीने मंगळवारी, २३ जून २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे शिक्षकांचा सहभाग होता. सकाळी ११.३० ते दुपारी चार या वेळेत भर पावसात आंदोलन करत शिक्षकांनी चुकीच्या शैक्षणिक धोरणाला विरोध नोंदविला. ऑनलाइन संचमान्यता नको, जुन्याच पद्धतीने संच मान्यता झाली पाहिजे अशी मागणी केली.
प्रा. सागर नागरगोजे इस्लामपूर, प्रा.विजय बेंद्रे सांगली, प्रा. वैभव पाटील सातारा, प्रा. दादासाहेब पाटील सांगली, प्रा. हातकर कोल्हापूर, प्रा.भरत वायकसकर यांनी भाषणात ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी केली. सीनियर कडील ज्युनियर कॉलेजची पंचेचाळीस मिनिटे तासिका झालीच पाहिजे. वीस विद्यार्थ्यांची बॅच झाली पाहिजे. जुन्याच पद्धतीने संच मान्यता झालीच पाहिजे या घोषणांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसर दणाणुन सोडले. या धरणे आंदोलनाला आमदार जयंत आसगांवकर यांनी पाठिंबा दिले. स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी आंदोलनासाठी केव्हाही तुमच्या पाठीशी आहे. असे सांगून पाठिंबाचे लेखी पत्र दिले. पुणे विभाग शिक्षक भारतीचे अध्यक्ष दादासो लाड आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला.
शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, प्रा. बी. आर. पाटील, प्रा. दिलीप जाधव, प्रा. वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. सी. एम. गायकवाड यांनी महासंघाच्या कार्याचा आढावा शिक्षकासमोर ठेवला.महासंघाचे सहसचिव प्रा. दिलीप शितोळे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. शिष्टमंडळाने सहायक शिक्षण संचालक गणपत कमळकर यांना निवेदन दिले. कोल्हापूर जिल्हा सचिव प्रा. बी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष ए. बी. बागडी यांनी आंदोलनात मोठया संख्येने सहभाग झाल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले. प्रा. विजय मेटकरी यांनी सूत्रसंचालन केले.