ग्रामीण भागातील केएमटीची सेवा बंद करा, अन्यथा सोळा तारखेला बसेस रोखू – कृती समितीचा इशारा
schedule08 Apr 25 person by visibility 260 categoryमहानगरपालिका

हद्दवाढ कृती समितीची प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका शहरवासियांना आवश्यक सोयी सुविधा पुरवत नाही म्हणून आमचा हद्दवाढीला विरोध आहे असा कांगावा ग्रामीण भागातील काही मंडळी करत असतात. वास्तविक महापालिका ग्रामीण भागासाठीही विविध सेवा पुरविते. शहरवासियांच्या कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेतून त्या सेवासुविधा दिल्या जातात. आसपासच्या गावात केएमटी बस सेवा सुरू असून त्यावर दर महिन्याला एक कोटी ७१ लाख याप्रमाणे वर्षाला वीस कोटीहून अधिक रक्कम खर्च होत आहे. महापालिकेने ग्रामीण भागातील केएमटीची बस सेवा बंद करावी आणि त्या रकमेतून शहरात विकासकामे करावीत. जेणेकरुन ग्रामीण भागातील नागरिकांच्या स्वप्नातील कोल्हापूर साकार होईल. महापालिकेने १६ एप्रिल २०२५ पर्यंत ग्रामीण भागातील बस सेवा बंद केला नाही तर कृती समिती केएमटीच्या बसेस रोखून धरेल.’असा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने दिला.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा केली. याप्रसंगी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे दोन दिवस झालेली बैठक सकारात्मक झाली. नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत झपाटयाने नागरिकीकरण होत असलेली गावे, भौगोलिक संलग्नता, महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा यासंबंधीची माहिती सादर केली आहे. सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.’असे शिष्टमंडळाला सांगितले. बैठकीत बोलताना बाबा इंदूलकर यांनी ग्रामीण भागात केएमटीच्या २१ रुट आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशी वाहतुकीसाठी महापालिका दर महिन्याला एक कोटी ७१ लाख रुपये खर्च करते. वर्षाला ही रककम वीस कोटीहून अधिक होते. ग्रामीण भागातील बस सेवा बंद करुन संबंधित रक्कम कोल्हापूर शहराच्या विकासासाठी खर्च करावी. ’असे सांगितले. कृती समितीचे निमंत्रक व माजी महापौर आर. के. पोवार यांनी हद्दवाढीची गरज बोलून दाखविली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, हद्दवाढीसाठी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशीलआहेत. मात्र बाकीचे आमदार, खासदार याविषयी बोलत नाहीत. कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी कृती समिती म्हणून सगळे चर्चा करू असे सांगितले.
भाजपाचे महेश जाधव यांनी या दोन्ही आमदारांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी आमची आहे.’असे सांगितले. बैठकीत महापालिकेतील अनेक कर्मचारी ग्रामीण भागातील आहेत. केएमटीचे कर्मचारीही विविध गावचे आहेत. मात्र हद्दवाढीविरोधात गाव बंद आंदोलन झाले तेव्हा ग्रामीण भागातील महापालिकेचे कर्मचारी त्या आंदोलनात होते. त्यांच्यावर कारवाई व्हावी असा मुद्दाही चर्चेत आला. मनसेचे पदाधिकारी राजू जाधव यांनी हद्दवाढ झाली नाही तर मंत्र्यांची वाहने फोडू असे विधान केले. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी, शहरी आणि ग्रामीण असा वाद न करता हद्दवाढीचा विषय मिटवावा अशी सूचना केली. चर्चेत माजी नगरसेकव बाबा पार्टे, अशोक भंडारे, पद्मा तिवले, राष्ट्रवादीचे पदाधिकारीसुनील देसाई, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, यांनी सहभाग घेतला. बैठकीला अतिरिक्त आयुक् राहुल रोकडे, चंद्रकांत सुर्यवंशी, अनिल चव्हाण, महादेव पाटील आदी उपस्थित होते.
……………..
वास्तव्य कोल्हापुरात, अन् हद्दवाढीला विरोध
बैठकीत बोलताना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीचा विषय आता राजकीय बनला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांचा हद्दवाढीला विरोध दिसत आहे. त्यांच्यासह ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींची मानसिकता बदलली तर हद्दवाढीचा विरोध मावळेल.’अशी मते मांडली. आमदार नरके हे तर कोल्हापुरात वास्तव्यास आहेत, आणि हद्दवाढीला विरोध करतात. हे योग्य नाही’असेही बैठकीत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.