अंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचा
schedule06 May 25 person by visibility 65 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण ५५०३ कोटी ६९ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे झाली. दरम्यान या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे १४४५.९७ कोटी व २५९.५९ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा उपस्थित होते.या मंजुरीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही आराखड्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम उपस्थित होते.
……………………
अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात : मंदिराचे दुरुस्ती व संवर्धन, किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन, मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन, दर्शनासाठी अच्छादित मंडप, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, लॉकर्स, शू स्टँड, भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा’ म्हणून विकास या कामांचा समावेश आहे.
…………………………..
श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात : श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन, पायवाटांचे जतन, कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन, भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती, घनकचरा व सांडपाणी प्रकल्प, केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण, यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास या कामांचा समावेश आहे.