खासदार मानेंविरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, निवासस्थानावर निषेध मोर्चा काढण्यावर ठाम
schedule25 Jul 22 person by visibility 1000 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार धैर्यशिल माने यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढला. उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आवाज कोणाचा शिवसेनेचा, गेले ते कावळे राहिले ते मावळे अशा घोषणा देत कार्यकर्ते शाहू मार्केट यार्ड येथील चौकात एकत्र आले. दरम्यान हाती शिवसेनेचा झेंडा, गळ्यात मफलर आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत कार्यकर्ते खासदार माने यांच्या निवासस्थानावर मोर्चाचे आयोजन केले होते. खासदार माने यांच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी मार्ग दणाणून सोडला. उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. उद्धव साहेबांनी तुम्हाला खासदार केले लोकसभेत पाठवले. ओ खासदार सांगा, शिवसैनिकांचे काय चुकलं या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विनायक साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, तालुकाप्रमुख शहर प्रमुख आदींचा सहभाग आहे. दरम्यान शिवसैनिकांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार माने यांच्या निवासस्थान परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता पोलिसांनी, खासदार माने यांच्या निवासस्थानापासून 200 दोनशे मीटर अंतरावर मोर्चा अडवला आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती उद्यानाजवळ शिवसेनेचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. रस्त्यावर ठिय्या मारून खासदार माने यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. गद्दार खासदारांचा करायचं काय खाली डोकं वर पाय, गली गली मे शोर है, माने चोर है अशा घोषणा दिल्या.