शिवाजी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, शोध समितीसाठी नावांची शिफारस
schedule06 May 25 person by visibility 110 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा कालावधी सहा ऑक्टोंबर २०२५ रोजी संपत आहे. त्यापूर्वीच नवीन कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुलपती कार्यालयाच्या आदेशानुसार कुलगुरू शोध समितीवर विद्यापीठाकडून एकाची सदस्य म्हणून नामनिर्देशन करायचे असते. त्या अनुषंगाने शोध समिती सदस्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्या परिषद या अधिकार मंडळाने तीन नावे सुचविली आहेत. त्यामध्ये आयआयटी इंदोरचे संचालक प्रा. सुहास जोशी, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानीचे कुलगुरू व्ही.रामगोपाल राव व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे राजीव आहुजा यांचा समावेश आहे. या तीन नावांपैकी प्रा. जोशी यांच्या नावाची पहिल्या क्रमांकाची, प्रा. राव यांच्या नावाची द्वितीय क्रमांकाने व आहुजा यांच्या नावाची तृतीय क्रमांकावर शिफारस करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाची व्यवस्थापन व विद्या परिषदेची सोमवारी (पाच मे २०२५) बैठक झाली. त्यामध्ये या नावांची शिफारस झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम अकरा (तीन) नुसार कुलगुरू शोध समितीवर विद्यापीठाने एका सदस्यासाठी नामनिर्देशन करायचे असते. त्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेने एकत्रितपणे त्या सदस्याचे नामनिर्देश करायचे असते. यासंबधी कुलपती कार्यालयाकडून वीस मार्च रोजी विद्यापीठाला पत्र पाठविले होते.