प्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!
schedule06 May 25 person by visibility 129 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे नवं नवे कारनामे समोर येत असताना प्रशासन आता अॅक्शन मोडवर उतरले आहे. ग्रामीण पाणी पुरवठयाच्या जुन्या पाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याबद्दल इमारत विभागातील शाखा अभियंता प्रदीप महावीर हुपरे यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कारवाई केली. तर मुलाला कमी दराने दुकानगाळा भाडयाने दिल्याप्रकरणी इमारत विभागातील उपअभियंता सदाशिव येजरे यांना काहर्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर, ‘दुकानगाळा भाडयाने देण्याची कार्यपद्धती माहित नव्हती, अनावधनाने गाळा हस्तांतर करण्याचा आदेश दिला होता.’असा कबुलीनामा येजरे यांनी प्रशासनाकडे दिला आहे. गेले काही दिवस बांधकाम विभाग हा अधिकाऱ्यांच्या कुरघोडी आणि कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य वर्तनाने गाजत आहे.
जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊस परिसरात रिकाम्या पाण्याच्या टाक्या होत्या. या टाक्या गॅस कटरने कापून शाखा अभियंता हुपरे यांनी परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्रार इमारत विभागातील उपअभियंता सदाशिव येजरे यांनी केली होती. कार्यालयास कोणतीही पूर्वसूचना न देता हुपरे यांनी हा सारा प्रकार केला होता. प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेत हुपरे यांना नोटीस काढली होती. त्यांच्याकडून प्राप्त खुलासा हा समाधानकारक नाही. त्यांना तत्काळ निलंबित करावे असे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे इमारत विभागातील उपअभियंता येजरे यांनी आपल्या मुलाला भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या काँम्पेक्समधील दुकानगाळा कमी दराने भाडयाने दिल्याचा प्रकार समोर आला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सांगावकर यांनी याप्रश्नी येजरे यांना नोटीस दिली. या नोटिसीला येजरे यांनी उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी, ‘दुकानगाळा ताब्यात देण्याची कार्यपद्धती माहिती नाही. यामुळे अनावधानाने गाळा हस्तांतर करण्याचा आदेश दिला. दरम्यान गाळा भाडयाने देण्याचा व हस्तांतरणाचा आदेश चुकीचा आहे हे समजल्यानंतर पुढील प्रकिया केली नाही.’