शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावर
schedule24 Jul 26 person by visibility 736 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर जिल्हयाने संपूर्ण देशभरात द्वितीय स्थान पटकाविले आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय नवी दिल्लीय यांच्याकडून २०२५ २६ या शैक्षणिक वर्षातील प्रतवारी निर्देशांकमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ४६१ गुण प्राप्त केले आहेत. यूडायस प्लस माहिती, राष्ट्रीय संपादणूक पातळी व इतर शैक्षणिक माहिती अशा एकूण ७० दर्शकांसाठी ६०० गुणांसाठी गुणांकन झाले. या गुणांकनाच्या आधारे शैक्षणिक निर्देशांकमधील स्थान निश्चित होते अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, शिक्षण समिती सभापती शीतल प्रवीण यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेने २०२४ २५ या शैक्षणिक वर्षात ४६३ गुण प्राप्त करत देशात प्रथम स्थान मिळवले होते. सलग दोन वर्षे जिल्हा देशात आघाडीवर राहिला शैक्षणिक निर्देशांकत सुधारणा करण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने कामकाज करत आहे. यासंबंधी सांगताना शिक्षणाधिकारी शेंडकर म्हणाल्या, ‘मागील शैक्षणिक निर्देशांकमधील कमी गुण मिळालेल्या निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला. शिक्षण विभागाकडून् कोल्हापूर जिल्हयाच्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीच्या माहितीच्या सर्व इंडिकेटरचे विश्लेषण केले. जिथे कमी गुण मिळाले आहेत, त्या शोधून उपाययोजना करण्यात आल्या. सुधारणेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला. सर्व तालुक्यातील शिक्षकांच्या सभा, शाळास्तरावर नोंद करावयाची माहिती, जमेच्या बाबी, उणिवा व कमतरता यासंबंधी मार्गदर्शन केले. युडायस प्लस प्रणालीमध्ये शाळांकडून माहिती भरुन तालुकास्तरीय कक्ष स्थापले.जिल्हास्तरीय नियोजन केले.’
‘शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात शाळांच्या भौतिक सुविधासाठी १९० गुण आहेत. स्वच्छतागृह दुरुस्ती, बांधकाम, रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा बाबीसाठी वेळोवेळी निधीची उपलब्धता करुन दिले.’असेही त्यांनी सांगितले. या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. हे यश जिल्ह्यासाठी अभिमानस्पद असल्याचे उद्गार त्यांनी काढले. शिक्षण समिती सभापती यादव यांनी, ‘ शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हयाच्या कामगिरीत सातत्य आहे. सलग दोन वर्षे जिल्हा देशात आघाडीवर राहिला. हे यश कौतुकास्पद आहे.’