Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडीगोकुळमध्ये काटे की टक्कर, 825 मतांची मोजणी पूर्णशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकरगोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

जाहिरात

 

मोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!

schedule19 Oct 26 person by visibility 206 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधि : मंत्री, खासदार, आमदार आणि दूध संघातील बडया नेत्यांचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवर एकहाती झेंडा फडकाविला. २५ संचालकांच्या जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला तेरा जागा मिळाल्या तर महायुतीच्या आघाडीला १२ जागेवर समाधान मानावे लागले. महायुतीने जिंकलेल्या 1२ जागा या सर्वसाधारण गटातील आहेत. विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना मोठा झटका बसला. तसेच गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ यांना पराभवाची चव चाखावी लागली.

  महिला प्रतिनिधीमधील दोन जागा, ओबीसी गटातील एक जागा, एससी गटातील जागा व भटक्या विमुक्त गटातील एक जागा आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीने जिंकल्या. राखीव गटातील या पाच जागा आमदार पाटील यांना सत्तेच्या दिशेने घेऊन गेल्या. या पाच जागा आणि सर्वसाधारण गटातील आठ जागा अशा तेरा जागांच्या बळावर गोकुळ जिंकले. २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेली गोकुळची निवडणूक यंदा कमालीची चुरशीची झाली. ५४१८ मतदारांपैकी ५४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यातील बारापैकी दहा तालुक्यात शंभर टक्के मतदान झाल होते.
 या निवडणुकीमध्ये महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक , आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक , आमदार शिवाजी पाटील अशी साऱ्या नेत्यांची मोट बांधण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने एकाकी झुंज दिली. सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्यांदा सर्वसाधारण गटातील मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीचा जो कल होता, त्यामध्ये महायुतीचे सोळा उमेदवार तर समविचारी आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर असे चित्र होते. दुपारनंतर राखीव गटातील पाच जागांची मतमोजणी सुरू झाली आणि निकालाचा कल बदलत गेला. राखीव गटातील पाच जागा समविचारी आघाडीने जिंकल्या. यामुळे सत्तेचा लंबक महायुतीकडून समविचारीच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. दुसरीकडे सर्वसाधारण गटातही धक्कादायक निकाल येऊ लागले. गोकुळमधील वजनदार नेते म्हणून अरुण डोंगळे हे पिछाडीवर पडले. पहिल्यापासून पिछाडीवर राहिलेल्या डोंगळे यांना आघाडीवर येण्याची संधी मतदारानी दिली नाही.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत महायुतीकडे अकरा जागा आणि समविचारीकडे १४ जागा चित्र होते.महायुतीमधील युवराज पाटील यांना २५१० मते तर माजी चेअरमन विश्वास पाटील यांना २५०७ मते मिळाली. त्यांच्या पुढे समविचारी आघाडीचे विश्वजीत दिनकरराव जाधव हे २५२९ मते घेऊन विजयी झाले होते. युवराज पाटील व विश्वास पाटील यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फेरमतमोजणीची मागणी केली. यामुळे निकाल घोषित होण्यास विलंब झाला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांनी फेरमतमोजणीची मागणी फेटाळली. आणि निकाल घोषित केला. यामध्ये समविचारी आघाडीचे १३ उमेदवार तर महायुतीचे बारा उमेदवार विजयी घोषित केले.

मातब्बरांना धक्का…तीन माजी चेअरमन पराभूत

 या निवडणुकीत गोकुळ मधील मातब्बर मंडळींना धक्का बसला. गोकुळचे माजी चेअरमन व गेली कित्येक वर्षे गोकुळ मध्ये संचालक व चेअरमन म्हणून काम केलेले विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांना पराभवाची चव चाखावी लागली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र व माजी चेअरमन नविद मुश्रीफ यांनाही ओबीसी गटातून पराभवाला सामोरे जावे लागले.ओबीसी गटामध्ये शशिकांत खोत यांनी नवीद मुश्रीफ यांचा पराभव केला.  आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीतून विजयी झालेले उमेदवार सर्वसाधारण गटातून शशिकांत पाटील चुयेकर,  अभिजीत तायशेटे, प्रा. किसन चौगुले, बाबासाहेब चौगुले, राहुल देसाई, विद्याधर गुरंबे, बाबासाहेब देवकर, विश्वजीत दिनकरराव जाधव हे उमेदवार विजयी ठरले. महिला गटातून अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे विजयी झाल्या. महिला गटातून महायुतीच्या उमेदवार शौमिका महाडिक यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. महाडिक यांचा ११० मतांनी पराभव झाला. ओबीसी गटातून शशिकांत खोत, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून बयाजी शेळके, अनुसूचित जाती जमाती गटातून राजूबाबा आवळे विजयी झाले. महायुतीकडून १२ उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राहुल पी एन पाटील, माजी आमदार राजेश पाटील, रणजीत के पी पाटील विजयी झाली. शिवसेनेकडून अजित नरके, वीरेंद्र मंडलिक, मदन देसाई, अजित पाटील विजयी ठरले. भाजपकडून चेतन नरके ,  अंबरीश घाटगे तर यड्रावकर गटाकडून रणजीत दिलीप पाटील निवडून आले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड जिंकले.

गोकुळम्घ्धील विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे : समविचारी आघाडी

अभिजित प्रभाकर तायशेटे — ३१९४, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर — ३१११, प्रा. किसन बापूसो चौगले — २८५१, बाबासाहेब श्रीपती चौगले — २६७०, राहुल बजरंग देसाई — २६५१, विद्याधर बाबूराव गुरबे — २६२७, बाबासाहेब देवकर २५५५, विश्वजीत दिनकरराव जाधव २५२९. राखीव गटातील उमेदवार महिला राखीव गट: अंजना केदारी रेडेकर (३४३१), भाग्यश्री धीरज डोंगळे (२५३१). इतर मागासवर्गीय गट: शशिकांत शामराव खोत (२९३८), अनुसूचित जाती गट: राजू बाबा आवळे (२९४५) ,  भटक्या-विमुक्त जमाती गट: बयाजी शेळके (२८५३)  विजयी झाले.

…………….

महायुतीचे विजीय उमेदवार

 

विरेंद्र संजय मंडलिक — ३०४६,   राहुल पांडुरंग पाटील — ३०४४, चेतन अरुण नरके — ३०२६, अंबरीषसिंह संजय घाटगे — २९३४,   अजित शशिकांत नरके — २८६९, मदन बाबुराव देसाई — २७९६, रणजितसिंह दिलीप पाटील — २७४४,  माजी आमदार राजेश पाटील —२६६९, रणजित के. पी. पाटील — २६६४, अजित पांडूरंग पाटील—२५९९, करणसिंह गायकवाड — २५८२, अमरसिंह पाटील — २५७२

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes