हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडी
schedule28 Jul 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: भारतीय हवाई दलातील माजी हवाई योद्धा, प्रख्यात ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर (निवृत्त) यांनी १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून मानवविज्ञान विद्याशाखेतून इंग्रजी विषयातील पीएचडी पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त करणारे ते पहिले हवाई योद्धा ठरले आहेत.
शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय हवाई दलासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत सेवेत असलेल्या इच्छुक हवाई योद्ध्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा शिवाजी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे देशसेवेबरोबरच शिक्षण घेण्याचीही संधी हवाई दलातील जवानांना मिळत आहे.
जवानांच्या शैक्षणिक उत्थानासाठी महत्त्वाचा असलेल्या या उपक्रमाचा लाभ भारतीय हवाई दलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन वालवडकर यांनी घेण्याचे ठरवून इंग्रजी या विषयामध्ये पीएच.डी. संपादन केली. विद्यापीठातून इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन करून या उपक्रमाचा लाभ घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त करणारा पहिला माजी हवाई योद्धा होण्याचा मान मिळविला आहे. 'इंडियन मिलीटरी ऑपरेशन्स - परसेप्शन अँड प्रेझेंटेशन इन सिलेक्टेड वॉर नॉन फिक्शन्स अँड वॉर मूव्हीज' या विषयावर त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ. तृप्ती करेकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.वालवडकर यांनी हवाई दलात २७ वर्षे लढाऊ सैनिक अधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून ३१ डिसेंबर २००९ रोजी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. कुलगुरू कामत यांनी, ग्रुप कॅप्टन वालवडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह डॉ. तृप्ती करेकट्टी, सौ. वालवडकर उपस्थित होत्या.