जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र
schedule11 Jun 26 person by visibility 92 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या शाळा इमारत, स्वच्छतागृह व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केले आहेत
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 1956 शाळा असून सर्व शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा जिल्हा परिषद व सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जातात. जेणेकरुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची सुविधा सर्व सामान्य वर्गातील मुलांना उपलब्ध व्हाव्यात हा हेतू असतो. उपलब्ध सुविधा नियमित स्वच्छ व वापरणे योग्य राहणेसाठी तसेच शाळांचा परिसर नियमित स्वच्छ ठेवणेसाठी मनुष्यबळ सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीकडील उपलब्ध मनुष्यबळ वापरुन प्रत्येक आठवड्यातील सोमवार व गुरुवार या दिवशी सकाळी नऊ ते दहा या वेळेत ग्रामपंचायतीकडील कर्मचारी उपलब्ध करुन शाळेची स्वच्छता करुन घ्यावी. याबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीकडील उपलब्ध मनुष्यबळ वापरुन शाळेची स्वच्छता करणेबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देणेत याव्यात. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत गटविकास अधिकारी यांनी या कार्यालयास सादर करावा असे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.