जीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणार
schedule09 Jun 26 person by visibility 11 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील वरिष्ठ अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापूरला भेट देणार आहेत. यामुळे व्यापारी व उद्योजकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. ’असे सीजीएसटी कार्यालयात पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांनी सांगितले.
कोल्हापूर कार्यालयात त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्योग व व्यापार क्षेत्रातील जीएसटी व कस्टम्स संदर्भातील समस्या, सूचना आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या हस्ते कन्सल यांचा कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारी विशेष स्मृतिचिन्ह स्वरूपातील आकर्षक फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट ही संस्था कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासासाठी विविध विषयांवर अजेंडा आधारित कार्य करत असल्याचे सांगितले.
यावेळी सचिन शिरगावकर, कुशल सामाणी, आदित्य बेडेकर, वीरेंद्र पाटील, अजित कोठारी, विज्ञान मुंडे यांच्यासह विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जीएसटी रिफंड, अपील प्रक्रिया, ई-वे चलन, जीएसटी कॉम्प्लायन्स आणि तांत्रिक अडचणींबाबत मांडणी केली. यावेळी सीजीएसटी कोल्हापूर विभागाचे आयुक्त सुमित कुमार यादव, सहायक आयुक्त प्रसाद डी. गोरसे, सबरीश जी, रोहित जोशी, भूपेंद्रसिंह पॉल, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, आय एफ कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सतीश कडुकर, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे बळीराम वराडे, सीए गिरीश कुलकर्णी उपस्थित होते