शिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभा
schedule09 Jun 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाच्यावतीने ११ जून २०२६ रोजी राळेगणसिद्धी येथे महामंडळ सभेचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता राळेगणसिद्धी येथील 'स्वर्ग लॉन्स' येथे महामंडळ सभा होणार. "चली राळेगणसिद्धी!" आणि "लढाई आत्मसन्मानाची!!" अशी घोषणा देत या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. सभेमध्ये प्रामुख्याने 'टीईटी रद्द करा' या मागणीसह शिक्षकांच्या विविध न्याय्य हक्कांसाठी एकूण १९ प्रमुख मागण्या केल्या आहेत.
शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राष्ट्र्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप,राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, मधुकर काठोले, बाळकृष्ण तांबारे, रावसाहेब रोहकले. म.ज.मोरे. बळवंत पाटील,कैलास दहातोंडे, विलास चौगुले,किशनराव इंगळे यांच्यासह राज्यभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. महामंडळ सभेच्या माध्यमातून २०१३ पूर्वीच्या शिक्षकांची टीईटी सक्ती रद्द करावी, पदोन्नती दिनांकावेळी सर्व पात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती करावी. टीईटी परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात यावी. प्राथमिक शिक्षकांकडील बीएलओसह सर्व प्रकारची ऑनलाइन व अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत. दुर्गम क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांची शिक्षणसेवक भरतीपूर्वी विनंती बदली करावी. मुख्यालय राहण्याची जाचक अट शिथिल करण्यात यावी. सर्व विषय शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. मनपा व नपा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी. समाजशास्त्र व भाषा विषय शिक्षकांच्या पदांना संरक्षण देण्यात यासह १९ मागण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूरच्या सर्व सभासद बंधू-भगिनींनी या महामंडळ सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील,सरचिटणीस सुनिल पाटील व दि प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन एस.व्ही.पाटील यांनी केले आहे.