२२ कोटीच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह ! कदम म्हणाले बाबा इंदूलकर, दिलीप देसाईंचा व्यवसाय काय ? प्रॉपर्टी आल्या कोठून ?
schedule24 Jul 25 person by visibility 65 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेनेचे जिल्हा समन्वयक व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी राज्य सरकारकडून मंजूर करुन आणलेल्या २२ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निधीवरुन कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदूलकर, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कामांची निविदा प्रक्रिया सुरू असतानाच यातील ७५ टकके काम पूर्ण झाली आहेत, त्याची महापालिका प्रशासकांनी तपासणी करावी अशी मागणी त्यांनी, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. यावरुन माजी नगरसेवक कदम यांनी,‘इंदूलकर व देसाई यांचा व्यवसाय काय ? त्यांच्या प्रॉपर्टी आल्या कोठून ? माहिती अधिकारात अर्ज करण्याचा त्यांनी बिझनेस सुरू केला आहे. महिनाभरात भांडाफोड करू’असा इशारा दिला आहे.
माजी नगरसेवक कदम यांनी, राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन २२ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध केला आहे. सध्या त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच इंदूलकर व देसाई यांनी, ’२२ कोटी रुपयांच्या विकासकामांची यादी तपासून पाहा. यातील ७५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.’अशी मागणी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. यामुळे २२ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निधीला नवे वळण लागले आहे. इंदूलकर व देसाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरुन माजी नगरसेवक कदम यांनी त्या दोघांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. कदम म्हणाले, ‘ त्या दोघांची प्रॉपर्टी आली कोठून ? त्यांचा व्यवसाय काय ? इंदूलकर हे नोकरी करत होते ? तेथून ते पळून गेले. तुमचा व्यवसाय कोणता, तुमची उंची काय ? तुम्ही काय बोलता ? ’असा सवालच कदम यांनी केला.
‘दिलीप देसाईंची प्रॉपर्टी आली कोठून, ती कशी गोळा केली ? मुलगा शिकतो कुठे ? देसाईंनी कोणत्या कार्यालयात किती माहितीचे अर्ज दिले याची माहिती घेत आहे. यासंबंधीची माहिती घेऊन महिनाभरात कोल्हापूरच्या जनतेसमोर मांडत आहे.’असे कदम यांनी सांगितले. कदम यांच्या या आरोपावर बोलताना देसाई यांनी, ‘माहिती अधिकार कायद्याचा मी योग्यरित्या वापर केला आहे. कदम यांनी कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी. माझ्या म्हणण्यावर मी ठाम आहे.’इंदूलकर म्हणाले, ‘आमच्यावर जे आरोप केले आहेत, ते कदम यांनी सिद्ध करुन दाखवावेत. महापालिकेकडे आम्ही जी तक्रार केली, त्या अनुषंगाने कदम यांनी बोलावे.’