पगार पत्रक तयार करण्यासाठी प्रशिक्षण द्या : खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची मागणी
schedule17 Oct 22 person by visibility 948 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी पगार पत्रक तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करा अशी लेखी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे प्राथमिक वेतन पथक अधिक्षक वसुंधरा कदम यांच्याकडे केली आहे.
गेल्या सात-आठ वर्षा पासून शाळांची पगार देयके शालार्थ वेतन प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने तयार करणे, ते ऑनलाईन फॉरवर्ड करणे सुरु आहे. संबंधित पगार पत्रक तयार करण्यासाठी मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता यापूर्वी / प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या प्रशिक्षणातून पगार पत्रक / फरक पत्रके तयार करण्या विषयीची पुरेशी माहिती मिळाली नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.
पगार पत्रक इतरांकडून तयार करून घेत असताना त्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून १०० रुपये आकारले जातात. शाळा स्तरावरील शिक्षक संख्या लक्ष्यात घेता दरमहा ५०० ते ७०० इतकी रक्कम संबंधित पगार पत्रक तयार करण्यासाठी दयावे लागत आहेत. तरी मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षकांना पगार पत्रक, फरक पत्रक तयार करण्यासंबंधी प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे, शिरोळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय आंधळे, संजय पाटील उपस्थित होते .