पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस हवालदार नामदेव यादव यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर
schedule25 Jan 23 person by visibility 1130 categoryलाइफस्टाइल

nullमहाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवलदार नामदेवराव यादव यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी प्रजासत्ताक दिनी शाहू स्टेडियमवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत आणि यादव यांना पदक देऊन गौरवण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील आहेत. त्यांचे बंधू पी. डी. पाटील हे उच्च शिक्षण घेऊन आरटीओ अधिकारी बनले. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत तानाजी सावंत हे पोलीस खात्यात भरती झाले. पीएसआयपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंत त्यांनी मजल मारली. या कालावधीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांना अधिकारी म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली. नाशिकमध्ये कार्यरत असताना त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गाव गुंडाचा एन्काऊंटर केला होता. कोल्हापुरात गेली सहा वर्षे ते कार्यरत आहेत. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली. जिल्हा विशेष शाखेत सध्या ते कार्यरत आहेत. कुप्रसिद्ध बिश्नोई टोळीतील तिघां खतरनाक गुंडांनी पोलिसांच्यावर हल्ला केला होता. किणी. टोल नाक्यावर वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये जा सुरु असतानाही परिस्थितीच भान ठेवून त्यांनी आपल्या पिस्तूलमधून बिश्नोई टोळीच्या दिशेन सहा राउंड फायर केले. त्यात बिश्नोई टोळीचे म्होरके जखमी झाले. त्यांना गजाआड करण्यात पोलीस निरीक्षक सावंत आणि त्यांच्या पथकाला यश आलं. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीतील खतरनाक गुन्हेगारांना अटक करण्यात कोल्हापूर पोलीस दल यशस्वी ठरलं होतं. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळ महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव देशात अभिमानान उंचावले गेले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवालदार नामदेव यादव या दोघांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले.