पालक सहभागातून वर्गाचा कायापालट, नेहरुनगर विद्यामंदिरात
schedule29 Jul 25 person by visibility 102 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: मनात जिद्द असेल तर अध्यापनासोबत आपल्या आसपासच्या परिस्थितीचा सुद्धा शिक्षक कायापालट करू शकतो, लोकसहभागातून विधायक कामे होऊ शकतात हे नेहरुनगर विद्यामंदिर येथील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. या विद्यामंदिरातील आदर्श शिक्षिका शैलजा पाटील यांनी लोकसहभागतून वर्गाचा कायापालट केला आहे. नवीन वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांचा चेहरा आनंदाने हरकून गेला.
शिक्षिका पाटील या महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. इयत्ता दुसरीच्या वर्गात अध्यापन सुरू झाल्यानंतर वर्गातील मुले तर बोलकी होतीच पण वर्गातले भिंतीही बोलक्या असाव्यात असे त्यांना वाटले. चित्रमय रंगीत वर्ग व्हावा यासाठी प्रथम स्वतः जवळचे पैसे जमा करून पालकांना वर्ग रंगवण्यासाठी निधी जमा करण्याचे आवाहन केले. वर्गशिक्षिका पाटील यांच्यावर विश्वास असणाऱ्या पालकांनी एका आठवड्यामध्ये वर्ग रंगवण्यासाठी निधी उभारला.
या ड्रीमर्स क्लासचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे होत्या. कुंभार यांनी आपल्या मनोगतातून प्राथमिक शिक्षण समितीमध्ये दूरदृष्टी ठेवून झोकून देऊन काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा अभिमान असल्याबाबत गौरवोद्गार काढले. डॉ. स्वाती खाडे यांनी सूत्रसंचालक केले. शिक्षक सुनील पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास संजय पाटील, शिवाजी गुरव आदी उपस्थित होते.