वारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के
schedule29 Jul 25 person by visibility 628 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश मंगळवारी (२९ जुलै २०२५) विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाला. डॉ. शिर्के हे शिवाजी विद्यापीठातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पदाची कर्तव्ये सांभाळून वारणा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार धारण करतील आणि त्यानंतर ते वारणा विद्यापीठाचे पूर्णवेळ प्रथम कुलगुरू होतील, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.
प्राप्त आदेशान्वये, डॉ. शिर्के यांची कुलगुरू पदावरील नियुक्ती, ते विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरू पदाचा पदभार ज्या दिनांकाला स्वीकारतील, त्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ११ मधील तरतुदींन्वये नियुक्त केलेले कुलगुरू आपले पदग्रहण करेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यापूर्वी सातारा येथे नव्याने स्थापित कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
“वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. याचे कारण म्हणजे माझे पदवी स्तरावरील प्रथम वर्षाचे शिक्षण हे याच संस्थेमध्ये झाले आहे. तेथून पुढे मी कोल्हापूर येथे शिक्षणासाठी दाखल झालो आणि पुढील समग्र कारकीर्द शिवाजी विद्यापीठात साकार झाली. आता शिवाजी विद्यापीठासारख्या मातृसंस्थेतील सेवा समाधानपूर्वक पूर्ण करीत असतानाच ही नवी संधी प्राप्त झाल्याने या मातृसंस्थेसाठीही काम करता येणार आहे, याचा आनंद वाटतो.”
- कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के