कोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !
schedule12 Aug 26 person by visibility 24 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘त्या’ प्रत्येकाची क्षेत्र वेगवेगळी. कोण शिक्षण व उद्योग क्षेत्रात कार्यरत तर कोण वैद्यकीय सेवेत आघाडीवर. तर कुणाची हॉटेल आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरी दमदार…आपल्या कार्यकर्तृत्वातून साऱ्यांनीच स्वतंत्र ओळख घडविलेली. कोल्हापूरच्या विकासातही योगदान दिलेले…अशा मान्यवरांचा ‘कर्तृत्व सन्मान सोहळा’ कोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर घडला. कोल्हापूर फर्स्टचे प्रमुख व उद्योजक सुरेंद्र जैन यांनी मुलाखतकारच्या भूमिकेत त्या कर्तबगारांची मुलाखत घेतली…त्यांच्या संवादातून यशाची कहाणी उलगडली…आणि सभागृहात टाळयांचा एकच कडकडाट झाला. हॉटेल पॅव्हेलियन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. शिवशंकर मरजक्के, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर फर्स्टचे प्रमुख जैन, उपाध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत, डॉ. अमोल कोडोलीकर, कारखानदार व संचालक कमलाकांत कुलकर्णी, सचिव बाबासो कोंडेकर, प्रताप पाटील, उज्ज्वल नागेशकर, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, नितीन हरगुडे, हरिश्चंद्र धोत्रे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी बोलताना संजय घोडावत यांनी,‘कोल्हापूरची देशभर विमान कनेक्टिव्हिटी निर्माण करणार आहे. देशभरातील विविध शहरांची हवाई कनेक्टिव्हिटीमुळे खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे.घोडावत ग्रुप त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक विमान कंपन्याच्या श्रेणीत आमची कंपीन सर्वोत्तम आहे.’असे सांगितले. डॉ. मरजक्के यांनी, मुलाखतीतुन वैद्यकीय सेवेचा प्रवास सांगितला. कोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर माझा जो सत्कार होत आहे, तो माझ्या एकटयाचा नसून वैद्यकीय सेवेचा आहे.’असे मरजक्के म्हणाले. बाळ पाटणकर म्हणाले, ‘युवराज संभाजीराजे यांच्यावतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विकासवाडी येथे बहुविध क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. हे मैदान शहरासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.’ याप्रसंगी विनोदकुमार लोहिया, ऋतुराज इंगळे आदी उपस्थित होते