राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेत दहा हजार कार्यकर्ते, सातशे वाहनांचा ताफा ! २५ एप्रिलला जिल्ह्यात रथयात्रा !!
schedule21 Apr 25 person by visibility 208 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे २५ एप्रिल २०२५ रोजी जिल्ह्यात महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गौरव रथयात्रेत दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग असेल अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या गौरव रथयात्रेत सातशे वाहने असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या रथयात्रेत मंगल कलश असणार आहे. या कलशमध्ये जिल्ह्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूंची माती, नद्यांचे पाणी एकत्रित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक रथयात्रेत सहभागी होणार आहेत.
रथयात्रेच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला कोल्हापूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘पन्हाळगड येथील छत्रपती शिवाजी मंदिर येथून २५ एप्रिल रोजी सकाळी साडे आठ वाजता गौरव रथयात्रेला प्रारंभ होईल. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले जाईल. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. पन्हाळगड येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन गौरव रथयात्रा मार्गस्थ होईल.
प्रयाग चिखली येथील संगमस्थळी कलश पूजन होईल. त्यानंतर रथयात्रा कोल्हापूरकडे येणार आहे. राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे अभिवादन कार्यक्रम आहे. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण व बिंदू चौक येथील महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवाद केले जाईल. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन झाल्यानंतर रथयात्रा माणगावकडे रवाना होईल. माणगाव येथून रथयात्रा जयसिंगपूरला जाईल. त्यानंतर सांगली राष्ट्रवादी काँग्रेसकडे महाराष्ट्र गौरव रथ सुपूर्द केले जाईल. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आढावा बैठकीला माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, बिद्रीचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, पंडितराव केणे, उमेश भोईटे, राजेश भाटले, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, रणजित पाटील, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरसिंह माने, सतीश पाटील, प्रकाश गाडेकर, माजी नगरसेवक महेश सावंत, प्रकाश गवंडी, प्रकाश कुंभार, उत्तम कोराणे, सुहास साळोखे, सुनील गाताडे, विश्वनाथ कुंभार, मधुकर जांभळे, अमित गाताडे, विकास पाटील-कुरुकलीकर, सुहास जांभळे, संजय चितारी, संतोष धुमाळ, विश्वनाथ कुंभार आदी उपस्थित होते.
……………..
मुंबईत एक मे रोजी शोभायात्रा
राज्यातील सहा विभागात महाराष्ट्र गौरव रथयात्रा निघणार आहे. राज्यातील विविध भागातील रथयात्रा तीस एप्रिल रोजी मुंबईत दाखल होतील. एक मे रोजी शोभायात्रा, महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त समारंभ होत आहे. मुंबई येथील महाराष्ट्र गौरव रथयात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने जाणार आहेत.