फावल्या वेळेचा सदुपयोग, वर्गातील सगळया विद्यार्थ्यांनी केल्या कविता ! साकारला कवी उमलताना कवितासंग्रह !!
schedule27 Apr 25 person by visibility 173 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कधी शाळा सुटल्यानंतर, कधी ऑफ तासाला विद्यार्थी - विद्यार्थीनींना कविता म्हणजे काय ? ती कशी सूचते ? त्यासाठी विषय कोणते निवडावेत ? असे प्रश्न समोर आणले आणि या विद्यार्थ्यांसमोर फावल्या वेळेत अगदी मधल्या सुट्टीतही या विद्यार्थ्यां सोबत कवितेच्या अविष्काराबाबतच चर्चा होत असे . विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व, गरज, गरीबी, आई, देशाभिमान, सायकल, कैफियत, वेदना, भविष्य, महत्वकांक्षा असे विविधांगी विषय सहजतेने शब्दबद्ध केले आणि अख्खा वर्गातील सगळयाच विद्यार्थ्यांनी कविता केल्या. हे विद्यार्थी आहेत, सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित कोरगावकर हायस्कूल कोल्हापूर येथील इयत्ता आठवीतील. विद्यार्थ्यांच्या कवितेतून साकारलेल्या ‘कवी उमलताना’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (२७ एप्रिल २०२५) होत आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेतील मराठीचे क्रियाशील वर्गशिक्षक सदाशिव -हाटवळ यांच्याकडून मार्गदर्शन लाभले आहे. या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सोमवारी सायंकाळी पाच वाजता विद्याभवन,( मुख्याध्यापक संघ ) शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे. शाहूवाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहेत . शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख नंदकुमार मोरे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा होत आहे.
कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांची या पुस्तकास प्रस्तावना लाभली असून आपल्या प्रस्तावनेत पुस्तकाचे अंतरंग आणि शाळेची, तसेच शिक्षकांची क्रियाशिलता त्यातून आकारास येणारे उपक्रम आणि सदरबाजार सारख्या झोपडपट्टी प्रभागातून फुललेली अक्षराची बाग यावरती मार्मिक भाष्य केले असून या सोहळ्यास माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि कवितेवर प्रेम असणाऱ्या उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना मनातल्या भावना कागदावर प्रतिबिंबीत झालेल्या आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या कौतुक सोहळ्यास आंतरभारती परिवारातील एम. एस. पाटोळे,सुचेता कोरगांवकर, जिनरत्न रोटे, संजीवभाई परीख, रवी मुळीक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, भरत अलगौडर, संध्या वाणी आदी मान्यवर उपस्थित रहाणार असून भारती मुद्रणालयाच्या तनुजा शिपूरकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहूल पवार तसेच भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे उपस्थित रहाणार आहेत.