महाराष्ट्र गौरव रथ २५ एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यात- जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील
schedule20 Apr 25 person by visibility 114 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र गौरव रथाचे आयोजन केले आहे. राज्यातील विविध भागातून हे गौरव रथ तीस एप्रिल २०२५ रोजी मुंबईत दाखल होतील. आणि एक मे रोजी मुंबईत गौरव रथ निघणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून २५ एप्रिल रोजी गौरव रथ काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट यार्ड येथील पक्ष कार्यालयात झाली. या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी, पश्चिम महाराष्ट्रातील गौरव रथाची सुरुवात पन्हाळा येथून होणार आहे. या गौरव रथमध्ये जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होतील या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान जिल्ह्यातून निघणाऱ्या गौरव रथविषयी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, ‘पन्हाळा येथे २५ एप्रिल रोजी सकाळी ८. ३० वाजता महाराष्ट्र गौरव रथाला प्रारंभ होईल.पन्हाळा येथून हा गौरव रथ प्रयाग चिखली येथे येईल. नदी संगमावर कलश पूजन होणार आहे. प्रयाग चिखली येथून हा रथ कोल्हापूरकडे रवाना होईल. राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे अभिवादन करण्यात येईल.
दसरा चौक मार्गे हा रथ बिंदू चौकात दाखल होईल. येथील महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले जाईल. यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर हा रथ माणगावकडे रवाना होईल. माणगाव परिषदेच्या ठिकाणाहून हा रथ जयसिंगपूरमार्गे सांगलीकडे रवाना होणार आहे. ’