स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका महायुतीद्वारे ! सहकारी संस्थेत सारे एकत्र !! हसन मुश्रीफ
schedule18 Apr 25 person by visibility 270 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढविणार आहे. ज्या ठिकाणी महायुती होऊ शकत नाही, तिथे स्वतंत्रपणे लढू. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीचाच नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व महापौर होणार हे निश्चित आहे. सहकारात राजकारण चालत नाही. सहकारी संस्थेत सगळयांनी एकत्रित येऊन पुढे जायचे ही भूमिका आहे.”असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे कोल्हापुरातून २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगुले, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे,बाळासाहेब देशमुख, मधुकर जांभळे, संतोष धुमाळ, शिरीष देसाई, सुहास जांभळे, एस. एन. मुजावर, राजू गुरव, अमित गाताडे, महिला आघाडीच्या शितल फराकटे, युवक राष्ट्रवादीचे नितीन दिंडे, निहाल कलावंत आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
याप्रसंगी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला यशाची खात्री नाही का ? या प्रश्नावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘यशाची खात्री आहे मात्र जिल्हा मध्यवर्ती बँका, गोकुळ या संस्था चांगल्या चालल्या आहेत. सहकारात राजकारण चालत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३ कोटी रुपये इनकम टॅक्स भरला. गोकुळने २८ कोटी रुपये इनकम टॅकस भरला. या संस्था शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, गोकुळ, बाजार समित्या, शेतकरी संघ येथे पक्ष बाजूला ठेवून सगळे एकवटतात. सहकारातील संस्था टिकल्या पाहिजेत. यामुळे साऱ्यांनी एकत्र येऊन काम करायचे ही भूमिका आहे.’
सहकारी संस्थेत सगळेजण एकत्रित काम करण्याची भूमिका मांडताय, तेव्हा विरोधकांशी काही चर्चा झाली का ? या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘निवडणुकांना अजून अवधी आहे. सध्या मी माझी भूमिका मांडली आहे. सगळयांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भलं करावं. ही त्या मागील धारणा आहे.’