कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!
schedule27 Feb 26 person by visibility 150 categoryशैक्षणिकजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे. तर बारा पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड दहा मार्च रोजी होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका सात फेब्रुवारी रोजी झाल्या होत्या. नऊ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. निकाल जाहीर होऊन तीन आठवडे होत असले तरी अद्याप अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे सदस्यांमध्ये अस्वस्थता होती. दरम्यान दोन दिवसापूर्वी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वीस मार्च २०२६ पूर्वी अध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम पार पाडावा अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी १७ मार्च रोजी सदस्यांची विशेष सभा होत आहे. तर पंचायत समिती सभापती निवडीसाठी दहा मार्च सभा होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला वीस जागा, भारतीय जनता पक्षाला बारा, शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीला चार जागा आहेत. हे सारे महायुतीचे घटक आहेत. तर काँग्रेस पक्षाला चौदा तर शिवशाहू आघाडीला एक जागा मिळाली आहे. महायुतीमध्ये अध्यक्षपदावर राष्ट्रवादी व भाजपाने दावा केला आहे.