जिल्ह्यात ताकत हसन मुश्रीफांचीच ! २० जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्षपदासाठी शड्डू ! !
schedule09 Feb 26 person by visibility 327 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने तब्बल २० जागा जिंकत सगळयात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसने चौदा जागा जिंकत जिल्हा परिषदेतील ताकत कायम असल्याचे सिद्ध केले. भारतीय जनता पक्षाला १२ जागा मिळाल्या तर शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाला पाच तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालीला शाहू आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे पक्ष व गारगोटी येथे शिवशाहू आघाडीचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत अध्यक्षपदासाठी शडडू ठोकला.
राज्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य व आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी मिळून एकूण सदस्य संख्या ५० पर्यंत जाते. महायुती म्हणून हे सारे घटक एकवटले तर जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकू शकतो. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेसने जिल्ह्यात ताकत दाखवून दिली. दुसरीकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना राधानगरी तालुक्यात धक्का बसला.
या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला पन्हाळा आणि हातकणंगलेत फटका बसला. चंदगडमध्ये भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना केवळ एका जिल्हा परिषदेत विजय मिळवता आले. चंदगड तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या तीन जागा जिंकल्या आहेत. राधानगरी तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शिवसेनेला कसबा वाळवे मतदारसंघाची फक्त एक जागा मिळाली. तर काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळाला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार अमृता अरुण डोंगळे या विजयी झाल्या.
मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळया आघाडयांना सोबत घेत निवडणूक लढविली. करवीर तालुक्यात दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश फायदेशीर ठरला. तसेच मुश्रीफ यांनी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणल्यामुळे तीन जागा मिळाल्या. कागल तालुक्यात मंत्री मुश्रीफ, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे यांनी एकत्रित निवडणूक लढवत सहा पैकी जागा जिंकल्या. कागलमध्ये शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक चितपट झाले. जिल्हा परिषदेत त्यांना यश मिळाले नाही. तर बारा पंचायत समितीच्या जागापैकी एकच उमेदवार निवडून आला. करवीर तालुक्यात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनाही फटका बसला. वडणगे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार इंद्रजीत पाटील हे विजयी झालेले एकमेव सदस्य होय.