पालकमंत्र्यांनी केले जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन
schedule21 Apr 25 person by visibility 443 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून जलद कार्यवाही होत असल्याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. ३१ डिसेंबर अखेर अनुकंपा प्रतीक्षासूचीमध्ये ३१ उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक अर्हता व जात प्रवर्गनुसार उपलब्ध असलेल्या गट क किंवा ड पदावर नियुक्ती देण्यात आली. पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई उपस्थित होते.
सरकारी यंत्रणेत चांगल्या पध्दतीने मेहनतीने आणि जबाबदारीने काम करुन लोकांचे उत्तरदायित्व स्विकारा असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले. एमपीएसीमार्फत निवड होण्यासाठी मुलं चार-पाच वर्ष अभ्यास करतात. पण त्यापैकी चार-पाच हजार मुलांचीच निवड होते. आता मर्यादित मुलांनाच नोकरी मिळत आहे. तुम्हाला एखाद्या दुर्देवी घटनेनंतर नोकरी मिळाली, नोकरी मिळाल्यानंतर शासकीय यंत्रणेचा फायदा करुन घेऊन मेहनतीने काम करा. नोकरी लागल्यानंतर रिटायर्ड होईपर्यंत या नोकरीच्या माध्यमातून गरजूंना मदत करा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि आपली सेवा चांगल्या प्रकारे बजावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितीतांना केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात समृद्धी मुळे, ओमकार दिवेकर, मुदस्सीर खान या नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.