फ्लॅट-व्यावसायिक कार्यालयांची कृत्रिम दरवाढ क्रिडाईचे सभासद करणार नाहीत, इतरांनीही कृत्रिम भाडेवाढ-दरवाढ टाळावा -के. पी. खोत
schedule12 Aug 25 person by visibility 188 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळणार आहे. सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांचे ये-जा वाढणार आहे. या साऱ्या मंडळींना अतिथी देवो भव या तत्वाप्रमाणे सेवा सुविधा देऊन कोल्हापूरच्या लौकिकात भर घालू या. फ्लॅट व व्यावसयिक कार्यालये व दुकानगाळयांची कृत्रिम दरवाढ कोल्हापूर क्रिडाईचे सभासद करणार नाहीत. इतरांनीही असा प्रकार करू नये असे आवाहन क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी केले आहे.
‘सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासाची मोठी संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा सदुपयोग करत, चांगल्या सेवा सुविधांच्या उपलब्धतेची पूर्तता करत कोल्हापूरचा नावलौकिक वाढवू.’अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्किट बेंच स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काही मंडळी कोल्हापुरातील फ्लॅट व दुकानगाळे, ऑफिसेसचे दर वाढले, भाडेवाढ झाली असा गैरसमज पसरवित आहेत. असा प्रकार करुन कोणीही कोल्हापूरचे नाव खराब होईल असे कृत्य करू नये असे आवाहन विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी केले. औरंगाबाद हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे म्हणाले, ‘कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापण्यासाठी चाळीस वर्षाचा लढा झाला आहे. या लढयात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील वकिलांचा सहभाग आहे. यामुळे इतर जिल्ह्यातील वकिल व पक्षकार यांना कोल्हापुरातील सर्किट बेंच आपले वाटले पाहिजे अशा पद्धतीने त्यांच्याशी साऱ्यांचा वर्तणूक व व्यवहार असावा. सहा जिल्ह्यातील नवोदित वकिलांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कमीत कमी फीमध्ये ते पक्षकारांना न्याय मिळवून देतील अशी खात्री आहे.’
‘कारवा’चे चेअरमन रत्नेश शिरोळकर म्हणाले, ‘सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर कोल्हापुरातील प्रत्येक घटकाने ‘संधी आणि आचारसंहिता’ समजून घेतले पाहिजे. ‘अतिशी देवो भव’चा अर्थ समजून येथे येणाऱ्या घटकांना सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत.’हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग म्हणाले, ‘सर्किट बेंचच्या उद्घाटन सोहळयासाठी कोल्हापुरात येणाऱ्या वकिलांना माफक दरात हॉटेलमधील सुविधा पुरविण्याचा निर्णय हॉटेल मालक संघाने घेतला आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.’ क्रिडाईचे उपाध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक प्रकाश देवलापूरकर म्हणाले, ‘क्रिडाईच्या सभासदांनी नेहमीच सामाजिक भावनेने काम केले आहे. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरकडे ओढा वाढला असला तरी पुरेशा प्रमाणात फ्लॅट तयार आहेत. क्रिडाईचा कोणताही सभासद कृत्रिम दरवाढ करणार नाही.’ पत्रकार परिषदेला बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, गणेश सावंत, प्रदीप भारमल, संग्राम दळवी, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष अरुण चोपदार , अॅड राजेश कडदेशमुख आदी उपस्थित होते.