शक्तीपीठ महामार्गच्या समर्थनार्थ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात, सहापट दराची मागणी
schedule19 Jul 25 person by visibility 184 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शनिवारी (१९ जुलै २०२५) शेतकऱ्यांनी सातबारा उतारा हाती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आमचा शक्तीपीठ महामार्गला पाठिंबा असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. तसेच काही बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सातबारा जमा केले. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी, शक्तीपीठ महामार्गसाठी जाणाऱ्या जागेला बाजारभावापेक्षा सहा पट अधिक दर द्यावा अशी मागणी केली. आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण उपस्थित होते.
‘शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्गला आमचा पाठिंबा, शक्तीपीठ महामार्ग विकासाचा मार्ग’अशा मजकुराचे फलक आणि घोषणा देत बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. यामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३०० हून अधिक बाधित शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना बाधित शेतकऱ्यांनी ‘शक्तीपीठ महामार्गला आमचा पाठिंबा आहे. शक्तीपीठ महामार्गमुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे. जिल्ह्यातील वंचित भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल.’असे सांगितले.
शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, निमशिरगाव या गावातून सचिन लंबे, सतीश माणगावे, वसंत पिसे, चंद्रकांत माने, महिला शेतकरी म्हणून वासंती हराळे रुक्मिणी माने, नीता पाटील आणि सविता आदींनी यांनी आपले सातबारा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिला. कोल्हापूर जिल्हा समर्थक शेतकरी समिती अध्यक्ष प्रा. दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगाडे, कमलाकर जगदाळे, नवनाथ पाटील, आनंदा धनगर, भीमराव कोतकर, हातकणंगले तालुक्यातील अमोल मगदूम, धनपाल आळते, अनिल पाटील, रोहित बांदर, राजू जमादार, प्रभाकर हेरवाडे, सूर्यकांत चव्हाण गारगोटी राम अकोलकर, मेघन पंडित, दत्ता पाटील, जयसिंग पाटील, सुरेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
……………….
‘शक्तीपीठ महामार्गवरुन विरोधी मंडळी फक्त विरोधाचे राजकारण करत आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा प्रकल्प ठरणारा आहे. विकास प्रकल्पाना राजकारणातून विरोध होऊ नये. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. बाधित शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या संदर्भात सरकारशी बोलू. शेतकऱ्यांच्या जमिनीला अधिकाधिक दर मिळावा यासाठी प्रयत्नशील राहूल.’
-राजेश क्षीरसागर, आमदार