ईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणी
schedule05 Jun 26 person by visibility 16 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआय) अंतर्गत कामगारांना मिळणा-या वैद्यकीय सुविधांबाबत नूतन सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्या सोबत कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ईएसआय हॉस्पिटल व ओपीडी सेवांमधील प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सहायक कामगार आयुक्तांचे स्वागत करण्यात आले.
‘ईएसआय हॉस्पिटलचा कोणत्याही अधिकृत ब्लड बँकेशी समन्वय टायअप नाही. यासाठी तातडीने मान्यताप्राप्त ब्लड बँकेशी टाय-अप करण्यात यावा. रक्त तपासणी, सोनोग्राफी तसेच एन्डोस्कोपी यासारख्या महत्त्वाच्या तपासणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. सदर सुविधा ईएसआय हॉस्पिटलमध्ये तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णांना रेफरल लेटर मिळवण्यासाठी वेळेचा अपव्यय व गैरसोय होत असल्याने रेफरल लेटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी. ईएसआय हॉस्पीटलमध्ये त्वचारोग तज्ञ उपलब्ध नाहीत. ईएसआय प्रशासन, औद्योगिक संघटना व लाभार्थी प्रतिनिधी यांच्यात नियमित सभा आयोजित करण्यात याव्यात.’अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेऊ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी ईएसआय हॉस्पीटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ.अनिल कुमार, डॉ.रविंद्र पवार, डॉ.घोंगडी, ईएसआय कार्यालय अधीक्षक संतोष माळगी, सेक्रेटरी प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.