महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांब
schedule05 Jun 26 person by visibility 70 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : महापालिकेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सत्तेत आहेत. महायुती म्हणून या तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली. सत्तेत सहभागी झाले. कधी पद वाटप, कधी सभागृहातील मतभेद यावरुन महायुतीचे नगरसेवक सदैव चर्चेत राहिले. शुक्रवारी, पाच जून रोजी महापालिकेत महायुतीत पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगले. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव यांचा कार्यालयीन प्रवेश झाला. आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. मात्र या कार्यक्रमापासून शिवसेनेचे नगरसेवक चार हात लांब राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
स्थायी समिती सभापती शिराळे, सभागृह नेते जाधव यांच्या कार्यालय प्रवेशासाठी शिवसेनेचा एकही नगरसेवक महापालिकेत उपस्थित राहिला नाही. त्यानंतर स्थायी समितीची सभा झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक हजर होते. दरम्यान स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या कार्यक्रमापासून शिवसेनेचे नगरसेवक लांब राहण्यामागील चर्चा मात्र महापालिका चौकात रंगली. शिराळे यांच्या कार्यालयीन प्रवेशची जी कार्यक्रम पत्रिका तयार झाली, त्या कार्यक्रम पत्रिकेत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.
नेमकी हीच बाब शिवसेनेच्या नगरसेवकांना खटकली. शिराळे हे ज्या प्रभाग क्रमांत सातमधून निवडून आले. त्या चार सदस्यीय प्रभागात दोन भाजपाचे नगरसेवक आहेत तर दोन शिवसेनेचे नगरसेवक आहेत. शिवसेना आमदारांच्या नावाचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकात नाराजी पसरली आणि त्यांनी कार्यक्रमापासून चार हात लांब राहण्याचे ठरविले. त्यानुसार शिवसेनेचा एकही नगरसेवक कार्यालयीन प्रवेशाप्रसंगी उपस्थित राहिला नाही. स्थायी समितीत शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ते ही सभापतींच्या कार्यालयीन प्रवेशाप्रसंगी अनुपस्थित होते. स्थायी समिती सभापती शिराळे व सभागृह नेते जाधव यांच्या कार्यलयीन प्रवेशाचा कार्यक्रम ठराविक अंतराने झाले. यावेळी भाजपाचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक उपस्थित राहिले. मात्र दोन्ही कार्यक्रमाला महायुतीतील घटक पक्ष राहिलेल्या शिवसेनेचे नगरसेवक मात्र गैरहजर होते. दुसरीकडे महापालिकेतील विरोधी बाकावरील काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी मात्र सभापती व सभागृह नेत्यांच्या कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या.