पर्यावरणपूरक गणेशोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा-सीईओ कार्तिकेयन एस
schedule12 Aug 25 person by visibility 67 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही जास्तीत जास्त कुटुंबे या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणेसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आज रोजी जिल्हास्तरीय बैठक झाली. " जिल्हयात २०१५ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यात येत आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे हे दहा वर्ष पूर्ण झाली असून या उपक्रमामुळे लोकांमध्ये झालेला पर्यावरणपूरक वर्तन बदल या वर्षी ही टिकवायचा आहे. यासाठी सर्वांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा." असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
ग्रामीण भागात 'एक गाव, एक गणपती' या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करताना धातुच्या/ संगमरवरी/ इतर पर्यायी किंवा मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना, 'घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी यासंबधी गावस्तरावर प्रबोधन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. तसेच गावनिहाय मुर्ती संकलन व पर्यायी विसर्जनासाठी ठिकाणे निश्चिती, त्या ठिकाणांची स्वच्छता, विसर्जनाकरिता आवश्यक काहिली संख्या किंवा वापरात नसलेल्या पाण्याच्या खणी निश्चित करण्याबाबत कळविल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
निर्माल्य संकलन, वाहतूक व योग्य व्यवस्थापन यासंबंधी चर्चा झाली. घरातून निर्माल्याचे वर्गीकरण केले जाईल याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांचेमार्फत जनजागृती करणे अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरून या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनादिवशी जिल्हा परिषद, कोल्हापूर, व उपप्रादेशिक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कोल्हापूर यांच्या पथकाव्दारे गावामध्ये केलेल्या नियोजनाच्या पाहणीसाठी भेटी दिल्या जाणार आहेत.या बैठकीला सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाबाबत जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी प्रास्ताविक केले.